राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत साईदर्शनासाठी येणार्या भाविकांची संख्या सातत्याने वाढत असून गर्दीमुळे भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे.

ऑनलाईन बुकींग करूनच साई दर्शनासाठी या, असे आवाहन साईबाबा संस्थानने करून देखील भाविकांनी ऑनलाईन ऐवजी दर्शनासाठी ऑफलाईन पास मार्ग अवलंबला आहे. त्यामुळे सोशल डिस्टंन्सचा फज्जा उडताना दिसत आहे. अडीच दिवसात 40 हजाराहून अधिक भाविकांंनी साईबाबा समाधीचे दर्शन घेतले.

साई मंदिरात प्रशासनाकडुन आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र ऑफलाईन पास काढून दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत असल्याने मंदिराच्या बाह्य परिसरात भाविकांची लांबच रांग दिसत आहे. आरतीच्या वेळी दर्शन बंद असल्याने त्या काळात गर्दी अधिकच वाढत आहे. मंदिराच्या बाह्य परिसरात रस्त्यावर होणारी गर्दी टाळण्यासाठी संस्थानकडून उपाययोजना करण्याची नितांत गरज असून त्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे.

सुट्टीच्या दोन दिवसात 30 हजार तर रविवार दुपारपर्यंत 10 हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. नविन वर्षाचे स्वागत साई दर्शनाने करण्यासाठी भाविकांची 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.