
शिर्डी (प्रतिनिधी)
साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ नियुक्ती बाबत विधी व न्याय विभागाने जाहिरातीद्वारे इच्छुकांकडून अर्ज मागविले असून प्रथमच विश्वस्त मंडळ निवडीची प्रक्रिया अर्जाद्वारे होत असल्याने नियम व अटी लागू असलेल्या या पदासाठी आपण पात्र आहोत का याची चाचपणी इच्छुकांनी सुरू केली आहे.
साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळात आपली वर्णी लागावी यासाठी देशातील अनेक मातब्बर व्यक्तींनी या पदासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावत विश्वस्त होण्याचा मान मिळविला आहे. परंतु गेल्या अनेक वर्षापासून विश्वस्त मंडळाची निवड प्रक्रिया झाल्यानंतर सदरची निवड प्रक्रिया नियमावलीला धरून न झाल्यामुळे अनेकांनी न्यायालयात धाव घेऊन ही निवड प्रक्रिया रद्द केली. परिणामी बन्याच दिवसांपासून साई संस्थानचा कारभार जिल्हा प्रधान न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखालील तदर्थ समितीच्या निगराणी खाली सुरू आहे.
आ. आशुतोष काळे याचा काही महिन्यांचा कार्यकाळ वगळता गेल्या अनेक वर्षांपासून साई संस्थानचा कारभार जिल्हा प्रधान न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. साईबाबा संस्थानची विश्वस्त मंडळाची निवड झाली की निवड प्रक्रिया असलेल्या त्रुटीवर अनेकांनी न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केल्यामुळे विश्वस्त मंडळ निवड प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही राज्याच्या विधी व न्याय विभागाने मंगळवारी यासंदर्भात साईबाबा संस्थान विश्वस्त निवड प्रक्रियेसाठी प्रथमच जाहिरात देण्यात आली आहे. यात अध्यक्ष, उपाध्यक्ष व विश्वस्त पदासाठी तीन वर्षाकरिता ही नेमणूक करण्यात येणार असून १७ मे २०२३ परत अर्ज मागवण्याची अंतिम तारीख आहे.
अर्जाचा नमुना व इतर तपशील शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. साईबाबा संस्थानच्या विश्वस्त निवड प्रक्रिया बाबत जाहिरात प्रसिद्ध झाल्यामुळे शिर्डीसह राज्यात विश्वस्त मंडळात आपली वर्णी लागावी यासाठी विधी व न्याय खात्याने दिलेल्या नियमावलीची तपासणी करून आपण या नियमात बसू शकतो का अशी चाचपणी इच्छुक असलेल्या व्यक्तींनी तपासण्यास सुरुवात केली आहे.
तसेच विधी व न्याय खाते हे भाजपकडे असल्यामुळे या विश्वस्त मंडळात आपल्या जवळच्या व्यक्तीला संधी मिळावी यासाठी भाजपच्या नेत्यांकडे इच्छुकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने या विश्वस्त मंडळात कोणाची वर्णी लावायची तसेच नियमावलीला धरूनच निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांना मोठी डोकेदुखी ठरणार आहे.
निवड प्रक्रिया योग्य पद्धतीने व्हावी व निवड झालेल्या सदस्यांवर पुन्हा आरोप होऊ नये यासाठी अर्ज दाखल करण्यापूर्वी अनेकांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचे समजते. असे असले तरी विश्वस्त निवडीबाबत सातत्याने न्यायालयात दाखल होणारी याचिकेमुळे अनेकांनी धास्ती घेतली आहे. १७ मे नंतर किती अर्ज दाखल झाले व नियमावलीला धरून पात्र सदस्य कोण असेल याबाबत नागरिकांना उत्कंठा लागली आहे. परंतु खरे चित्र विश्वस्त मंडळ निवडीनंतरच स्पष्ट होईल.
अनेक वर्षापासून शिर्डी विश्वस्त मंडळ निवड प्रक्रिया न्यायालयाच्या चकाट्यात सापडल्यामुळे साईबाबा संस्थान मधील विविध विकास कामे कासवाच्या गतीने सुरू आहे. परिणामी अद्यावत दर्शन रांग, सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टरांची भरती, हॉस्पिटलसाठी रुग्णांना लागणारी नवीन मशनरी खरेदी, संस्थान मधील कायम कंत्राटी कामगारांचा प्रश्न, नवीन कंत्राटी कामगार भरती, संस्थाच्या मालकीच्या असलेल्या विविध जागेत होणारे विकास कामे आशा अनेक कामांना विश्वस्त मंडळ नसल्यामुळे तात्काळ निर्णय घेता येत नाही. परिणामी अनेक वर्षापासून साईबाबा संस्थानच्या होणाऱ्याला विकासाला चालना मिळत नाही यासाठी तात्काळ विश्वस्त मंडळ निवड होणे गरजेचे असल्याचे मत साई भक्तांनी व्यक्त केली आहे.