तब्बल दहा महिन्यांनंतर शिर्डीत साईबाबा पालखी सोहळा

तब्बल दहा महिन्यांनंतर शिर्डीत साईबाबा पालखी सोहळा

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

करोडो साईभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी येथील साईबाबांचा पालखी सोहळा काल गुरुवारी रात्री लॉकडाऊनंतर तब्बल दहा महिन्यानंतर प्रथमच

सुरू झाल्यानंतर साईसंस्थानचे सोन्याबापू बनकर, कैलास डांगे, गणेश कावले,राकेश ठाकरे हे चौघेजण पहिल्या वहिल्या पालखीचे मानकरी ठरले असून या अभूतपूर्व पालखी सोहळ्याचे साईभक्तांनी साईनामाच्या गजरात स्वागत केले.

दरम्यान मागील वर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असलेल्या साईमंदिराचे दरवाजे 17 मार्च रोजी बंद करण्यात आले होते. जगत्विख्यात असलेल्या साईमंदिराचे दरवाजे बंद जरी केले होते तरीदेखील करोनाच्या काळात साईबाबांची दैनंदिन पुजाअर्चा साईसंस्थानकडून सुरूच होती. मात्र प्रत्येक गुरूवारी बाबांच्या हयातीपासून सुरू असलेला द्वारकामाई ते चावडी साईपालखी सोहळा कोव्हिड नियमांचे पालन करत संस्थान प्रशासनाच्या वतीने बंद करण्यात आला होता. राज्यात करोनाचा कहर कमी झाल्यावर टप्याटप्याने राज्य सरकारने संचारबंदी शिथिल केली आणी तब्बल आठ महिण्यांनी श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणार्‍या श्री साईबाबांचे मंदिराचे दरवाजे भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.

मंदिरात दर्शनव्यवस्था कोव्हिड नियमानुसार करण्यात आली.शिर्डी ग्रामस्थ तसेच साईभक्ताकडून गुरूवारचा साईपालखी सोहळा सुरू करण्यात यावा यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. ग्रामस्थांनी देखील पालखी सोहळा सुरू करावा अशी मागणी लावून धरली त्यानुसार आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीने अखेर काल गुरुवार दि. 4 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास टाळ मृदुंगाच्या निनादात वाजतगाजत संस्थानच्या वतीने साईबाबांचा पालखी सोहळा नेहमीप्रमाणे काढण्यात आला.

संस्थानचे अवघे पंधरा ते वीस कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत कोव्हिड नियमांचे पालन करत पालखी सोहळा काढण्यात आला. यावेळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून साईबाबा संस्थानचे सुरक्षा कर्मचारी तसेच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.चोहोबाजूंनी बँरीगेटींग लावण्यात आले होते. दहा महिण्यांनी साईबाबांच्या पवित्र पादुका आणी सटका नयनरम्य पालखी सोहळ्यात बघायला मिळाल्याने ग्रामस्थांच्या तसेच असंख्य साईभक्तांच्या डोळ्याची पारणे फिटले असल्याची भावना भक्तांनी व्यक्त करून दाखवली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com