साई मंदिरातील काचेचा अडथळा पुन्हा जैसे थे!

सुरक्षारक्षक व संस्थान अधिकार्‍यांचा मनमानी
साई मंदिरातील काचेचा अडथळा पुन्हा जैसे थे!

शिर्डी (प्रतिनिधी)

साई समाधी मंदिरात सुरक्षा रक्षक व अधिकारी मनमानी सुरू असून गर्दी नसतानाही समाधीच्या बाजूला लावलेल्या काचा व जाळ्या काढत नाही. ठराव घेऊनही त्याला वाटाण्याच्या अक्षदा दाखविल्या जातात असा आरोप बाळासाहेबांच्या शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी केला असून, समाधी मंदिरातील हा अडथळा दूर करून संबंधित कर्मचारी अधिकारी यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, असे पत्र कमलाकर कोते यांनी शुक्रवारी साई संस्थान प्रशासनाला दिले आहे.

साई समाधी मंदिरातील काचा व जाळ्या काढण्यासंदर्भात शिर्डीतील सर्वपक्षीय कार्यकर्ते व ग्रामस्थांनी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटून साईभक्तांना येणार्‍या समस्यांबाबत निवेदन देऊन याबाबत सविस्तर चर्चा केली होती. ग्रामस्थ व साईभक्त यांच्या मागणीचा व इतर  सर्व बाबींचा विचार करून साई संस्थान प्रशासनाने फक्त गर्दीच्या दिवशी काचा लावण्यात येईल व इतरवेळी त्या लावणार नाही. असे आश्‍वासन  ग्रामस्थांना दिले होते.

त्याप्रमाणे संस्थान प्रशासनाने साई मंदिरातील काचा व जाळ्या तसेच द्वारकामाई मंदिरात भक्तांना चबूतार्‍यावर दर्शन तसेच गुरुस्थान मंदिरात भाविकांना  प्रदक्षिणा घालता येईल अशा विविध ग्रामस्थांनी निवेदन दिलेल्या प्रश्‍नांची साईबाबा संस्थाने सकारात्मक प्रतिसाद भक्तांना कुठली प्रकारची समस्या निर्माण होणार नाही यासाठी उपाययोजना सुरू केल्या होत्या. परंतु मंदिरात सुरक्षा रक्षक व अधिकारी मनमानी करत असून गर्दी नसतानाही समाधीच्या बाजूला लावलेल्या काचा व जाळ्या काढत नाही. ठराव घेऊनही त्याला वाटाण्याच्या अक्षदा दाखविल्या जातात.असा आरोप कमलाकर कोते यांनी केला आहे.

आमची मागणी ही वैयक्तिक हितासाठी नसून शिर्डीत येणार्‍या देश विदेशातील भाविकांना समाधीला स्पर्श करून दर्शनाचे समाधान व आनंद मिळावा हाच यामागील प्रामाणिक हेतू आहे, असे कमलाकर कोते यांनी म्हटले आहे.  समाधी मंदिरातील हा अडथळा दूर करून संबंधित कर्मचारी अधिकारी यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी असे पत्र त्यांनी शुक्रवारी साई संस्थान प्रशासनाला दिले आहे.

 प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी पदभार स्वीकारला असून भाविकांच्या सुरक्षा, समाधानाने दर्शन,  ग्रामस्थांचा आदर,  साई संस्थांनमधील कंत्राटी कामगार, रिक्त पदे, पदोन्नती व वेतनवाढ, आद्यवत दर्शन रांग तात्काळ सुरू करणे  असे विविध प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे.  कमलाकर कोते यांनी दिलेल्या निवेदनावर साई संस्थान प्रशासन काय कारवाई करणार ? हे महत्वाचे ठरणार आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com