शिर्डीत आता साईबाबांचा गोकुळाष्टमी उत्सव
सार्वमत

शिर्डीत आता साईबाबांचा गोकुळाष्टमी उत्सव

Arvind Arkhade

शिर्डी|शहर प्रतिनिधी|Shirdi

‘सबका मालीक एक’ असलेल्या शिर्डी येथील साईबाबांच्या हयातीत सुरू असलेला तदनंतर काळाच्या ओघात बंद झालेला गोकुळाष्टमी उत्सव सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय साईबाबा संस्थानने घेतला असून या निर्णय प्रक्रियेत सकारात्मक भूमिका बजावणारे साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांचा शिर्डी ग्रामस्थांनी सत्कार केला.

साईबाबा संस्थानच्या या निर्णयामुळे शिर्डीत गोकुळाष्टमीच्या रूपाने चौथा उत्सव सुरू होणार आहे. साईबाबांच्या हयातीत रामनवमी, गुरूपौर्णिमा व गोकुळाष्टमी उत्सव साजरे करण्यात येत. बाबांच्या निर्वाणानंतर पुण्यतिथी उत्सवाची भर पडली़ साईभक्त तात्या कोते यांच्याकडे रामनवमी बरोबर गोकुळाष्टमी उत्सवाची जबाबदारी होती़ समाधीच्या काही वर्षांनंतर आठ दिवस चालणारा गोकुळाष्टमी उत्सव हळूहळू मागे पडला.

शिर्डी गॅझेटिअरच्या माध्यमातून हा विषय समोर आला. सोशल मीडियातही या विषयावर ग्रामस्थांबरोबर भाविकांनी हा उत्सव पुन्हा सुरू होण्यासाठी आग्रह धरला. या पार्श्वभुमीवर ग्रामस्थांनी साईबाबा संस्थानला लेखी निवेदनाद्वारे हा उत्सव सुरू करण्याची मागणी केली होती.

गेल्या पंचवीस वर्षांपासून सुरू असलेला साईसच्चरित्र पारायण सोहळा श्रावणाच्या पहिल्या दिवशी सुरू होत असे. आता तो साधारण 15 दिवस पुढे गोकुळाष्टमीला जोडून घेण्यात येणार असल्याने पुर्वीचा गोकुळाष्टमी उत्सव पुनर्जिवीत होणार आहे. साईसच्चरित्र पारायण सोहळा श्रीकृष्ण नवरात्रात येत असल्याने त्याचे आगळेवेगळे महत्त्व आहे. या उत्सवामुळे श्रावणात भाविकांचा ओघ वाढणार आहे. करोनामुळे यंदा हा उत्सव भाविकांशिवाय साध्या पद्धतीने साजरा होईल.

साईसंस्थानने ग्रामस्थ व भाविकांच्या श्रद्धेचा आदर करत साईबाबांच्या काळात सुरू असलेला उत्सव सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ज्ञानेश्वर गोंदकर, तात्या कोतेंचे वंशज बाबासाहेब कोते, अभय शेळके, कमलाकर कोते, विजय जगताप, सुजीत गोंदकर, नितीन कोते, प्रमोद गोंदकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांची भेट घेऊन सत्कार केला.

या ऐतिहासिक निर्णयामुळे संस्थानच्या तदर्थ समितीचे सदस्य असलेले प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, अप्पर महसूल विभागीय आयुक्त दिलीप स्वामी, सहाय्यक धर्मादाय आयुक्त गीता बनकर यांची शिर्डीच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद होईल अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

Deshdoot
www.deshdoot.com