शिर्डी साईबाबा विश्वस्त मंडळाच्या उर्वरित सदस्य नियुक्तीबाबत उद्या अंतिम सुनावणी

नेमणूक करण्यासाठी सरकारकडून जोरदार हालचाली
शिर्डी साईबाबा विश्वस्त मंडळाच्या उर्वरित 
सदस्य नियुक्तीबाबत उद्या अंतिम सुनावणी

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी येथील श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्थेतील 11 विश्वस्तांची निवड होऊन सात महिने उलटले असून उर्वरित 5 विश्वस्त पदांंची निवड करण्यात यावी असा आदेश जारी केला होता. मात्र राज्य सरकारकडून पाच विश्वस्तांची नियुक्ती करण्यासाठी विलंब झाला आहे. याप्रकरणी दि.20 रोजी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात अंतिम सुनावणी होणार आहे. राज्य सरकारच्या वतीने पाच विश्वस्तांची नेमणूक करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहे अशी माहिती खात्रीपूर्वक सुत्रांकडून मिळाली आहे.

दरम्यान, श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्थेवर विश्वस्त पदाचा तिढा दोन वर्षांच्या कालखंडानंतर सुटला असून महाविकास आघाडी सरकारने अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तर उपाध्यक्ष सेनेकडे ठेवले. कोपरगाव विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. आशुतोष काळे यांनी दि.17 सप्टेंबर 2021 रोजी अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतली. यावेळी त्यांचे सहकारी असलेल्या दहा विश्वस्तांनी शिर्डीत साईदरबारी येऊन साईसमाधीचे दर्शन घेतले होते. त्यावेळी साई मंदिरातील सभागृहात विश्वस्तांनी पदभार स्विकारुन स्वाक्षर्‍या केल्या आहेत.

डिसेंबर 2019 मध्ये श्री साईबाबा विश्वस्त मंडळाची मुदत संपली होती. तेव्हापासून प्रशासकीय स्तरावर व न्यायालय तसेच तदर्थ समिती निर्णय घेत होते.देशातील श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डी साई संस्थानच्या 17 विश्वस्तांपैकी पदसिद्ध विश्वस्त सोडून 11 विश्वस्तांची निवड करण्यात आली असली तरी देखील उर्वरित काँग्रेसच्या 2, शिवसेनेच्या 2 आणि राष्ट्रवादी 1 अशा एकूण 5 जागांवर कोणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागुन होते. विश्वस्त पदांची संख्या पुर्ण नसल्याने धोरणात्मक निर्णय घेता आला नाही. सध्याच्या विश्वस्त मंडळाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दैनंदिन कामे करण्याची परवानगी आहे. असे असले तरी उर्वरित पाच सदस्य नियुक्तीस शासनाकडून विलंब झाला आहे. न्यायालयाने यासंदर्भात राज्य सरकारला फटकारले आहे.

त्यामुळे आता दि.20 रोजी विश्वस्त मंडळ नियुक्ती प्रकरणी अंतिम सुनावणी असल्याने राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. पाच विश्वस्त निवडीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्याचे समजते. त्यामुळे कोणाला संधी मिळते हे बघणे औत्सुक्याचे ठरणार असून शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या चार जागांपैकी दोन जागा शिल्लक असल्याने शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्त्यांना प्राधान्य मिळणार का? जर मिळणार असेल तर शिर्डी शहरातून सेनेचा कोण विश्वस्त होईल याबाबत तर्क लढवले जात आहे. तसेच काँग्रेसच्या कोट्यातून दोन जागा शिल्लक आहे. यामध्ये शिर्डी शहरातील एका नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते अशी चर्चा आहे. तर राष्ट्रवादी एक जागेवर कोणाची निवड करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे.

सदर सुनावणीदरम्यान श्री साईबाबा संस्थानवर राज्य सरकारने नियुक्त केलेल्या 11 विश्वस्तांची पात्रता तसेच नव्याने स्थापन केलेले विश्वस्त मंडळ नियमानुसार आहे की नाही याबाबत युक्तीवाद होईल.

- अ‍ॅड. अजिंक्य काळे औरंगाबाद हायकोर्ट

Related Stories

No stories found.