
शिर्डी | प्रतिनिधी
आंतराष्ट्रीय ख्याती असलेल्या साईसमाधी मंदिराला गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर विशेष सुरक्षा बलाचे सुरक्षा रक्षक तैनात असणार आहे. शिर्डीत दिवसेंदिवस भाविकांची वाढती गर्दी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी होणारी दमछाक हे साई संस्थान सुरक्षेला व पोलीस सुरक्षा यंत्रणेला मोठं आव्हान होतं, तसेच मंदिराच्या पाचही गेटवर दररोज काहींना काही वाद होत होते तर विनापास प्रवेश करून अनेकजन भाविकांचे फुकट दर्शन घडवून स्वतःचा आर्थिक फायदा घेत होते. याचे वाढते प्रमाण व त्यामाध्यमातून वाढती गुन्हेगारी यावर नियंत्रण ठेवणे संस्थानला मोठे कठीण जात होते.
त्यातच साई संस्थानने गेट नं.३ हे शिर्डी ग्रामस्थांसाठी दररोज दर्शनासाठी जाणाऱ्या ग्रामस्थांसाठी उपलब्ध करून दिले होते, मात्र त्याठिकानीही ग्रामस्थांच्या नावाखाली अनेक लोक फुकटच्या दर्शनाचा लाभ घेत होते. तर ओळखपत्र हे फक्त नावालाच होते. त्यामुळे त्या गेटवर अनेक एजंट हे भाविकांकडून अव्वाच्या सव्वा भावात दर्शनाची सेटिंग करून प्रवेश देत होते. यावरून अनेकवेळा गेट नं. ३ वर बाचाबाची, हाणामाऱ्या झाल्याच्या घटना ताज्या आहेत. मात्र आता महाराष्ट्र राज्याची अग्रगण्य अशी महाराष्ट्र सुरक्षा बल ह्या यंत्रणेची नियुक्ती साई संस्थनने केली असून त्यासाठी करारही करण्यात आला आहे.
याची अंमलबजावणी २ जुलै अर्थात गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर केली जाणार असून सुरुवातीला ह्या विशेष पोलीस सुरक्षा बलाचे ७४ जवान शनिवारी दाखल झाले असून त्यांनी शनिवारी साईसमाधी मंदिर, मंदिर परिसर, दर्शनरांग, पाचही गेट याची सखोल पाहणी केली आहे. ही सुरक्षा यंत्रणा सुरक्षेचे घालून दिलेले सर्व नियम काटेकोरपणे पाळत असते त्यामुळे अनेकांनी याची धास्ती घेतली असून कामाशिवाय, ओळखपत्राशिवाय, विणापास, तसेच पाहुणे, मित्र यांना प्रवेश देणार नाही. या विशेष सुरक्षा यंत्रणेच भाविकांनी स्वागत केलं असून यापूर्वी मंदिर व मंदिर परिसरात चालत आलेले गैरप्रकारावर आता आळा बसणार आहे .
याचिकाकर्ते संजय काळे यांनी साई मंदिराला केंद्रीय सुरक्षा बलाची मागणी केली असून त्याबाबदचा निर्णय मा. उच्च न्यायालयात पेंडिंग आहे. तत्पूर्वी साई संस्थान त्रिसदस्यीय समितीने महाराष्ट्र सुरक्षा बल यांच्याशी कायदेशीर करार करून सदर सुरक्षा यंत्रणा २ जुलै पासून सुरू करणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी पी. सिवाशंकर यांनी दिली आहे. यासाठी साई संस्थानला महिन्याला २१ लाख रुपये खर्च येणार आहे . तर यामुळे शिर्डीतील गुन्हेगारी, भाविकांची फसवणूक व लूट यावर नक्कीच पायबंद बसणार असल्याच्या प्रतिक्रिया भाविकांनी दिल्या आहेत.