
शिर्डी (शहर प्रतिनिधी)
उसनवार दिलेले पैसे परत मागितले असता जिवे मारण्याची धमकी दिल्याने शिर्डी शहरातील श्री साईबाबा संस्थान कर्मचारी विकास रामचंद्र दिवटे याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असून आत्महत्या करण्यापूर्वी ११ जणांच्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवली आहे.
मयत विकास दिवटे (वय ३७) रा. हौसिंग सोसायटी, निमगाव कोऱ्हाळे, शिर्डी हा साईसंस्थानच्या बगीच्या विभागात काम काम करत होता. याने गुरुवार दि. ९ जून रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
मयत विकास याने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या पत्नीच्या नावे एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यामध्ये आपल्या मित्रांना तसेच इतरांना मिळून ११ जणांना लाखो रुपये उसनवार दिले असल्याचे म्हटले आहे. तसेच या चिठ्ठीत नावे आणि मोबाईल नंबर लिहून ठेवले आहे. मयत विकास यास धमकी दिल्याचेही मोबाईलमध्ये नमूद असल्याचे सांगण्यात आले आहे.
शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे. पोलिसांकडून सामनेवाल्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मयत विकासच्या नातेवाईकांनी घरामध्ये मृतदेह झाकून ठेवला होता. याची माहिती पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांना समजताच त्यांनी मयताच्या नातेवाईकांना आरोपींवर शंभर टक्के कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर मयत विकास याचा अंत्यविधी करण्यात आला.