शिर्डी साईबाबांची काकड व शेजारती तसेच पंढरपूरची दैनंदिन आरती पुन्हा सुरु करा

श्रीरामपूर मुस्लीम समाजाच्यावतीने निवेदनाद्वारे मागणी
शिर्डी साईबाबांची काकड व शेजारती तसेच पंढरपूरची दैनंदिन आरती पुन्हा सुरु करा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीक्षेत्र शिर्डी येथील श्रीसाईबाबांची पहाटेची काकडआरती व शेजआरती, तसेच श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्रीविठ्ठल मंदिराची दैनंदिन आरती गेल्या दोन दिवसांपासून ध्वनीक्षेपकांवरून बंद करण्यात आली असून ती नियमित सुरु करण्यात यावी, अशी मागणी श्रीरामपूर मुस्लीम समाजाच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन मुस्लीम समाजाच्यावतीने तहसीलदार प्रशांत पाटील यांना देण्यात आले. या निवेदनात पुढे म्हटले आहे की, श्रीक्षेत्र शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून येणार्‍या भाविक भक्तांची संख्या मोठी आहे. श्रीसाईबाबांवरील श्रद्धेपोटी दूर अंतरावरून येणार्‍या भाविकांची गैरसोय होवू नये, तसेच अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्रीविठ्ठल चरणी नतमस्तक होण्यासाठी येणार्‍या वारकरी भाविकांचा ओघ लक्षात घेता या दोन्हीही तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी दैनंदिन आरतीचा भक्तजणांना लाभ व्हावा व गैरसोय दूर व्हावी म्हणून परंपरेनुसार ध्वनीक्षेपकाद्वारे करण्यात येणारी दैनंदिन आरती यापुढेही चालु ठेवण्यात यावी.

श्रीसाईबाबा व श्रीविठ्ठल-रुख्मीणी हे दोन्हीही दैवत राष्ट्रिय एकात्मतेची प्रतिके मानली जातात. परंपरेनुसार ध्वनीक्षेपकाद्वारे आरती सुरू असतांना असंख्य भाविक मनोमन भक्तीभावाने सहभागी होवुन, आहे त्या ठिकाणावरून परमेश्वराप्रती आपली श्रद्धा व्यक्त करीत असतात. भाविक भक्तांचा तो अधिकार ध्वनीक्षेपकांमुळे संपुष्टात येवू नये, यासाठी दोन्हीही तिर्थक्षेत्राचे ठिकाणी परंपरेनुसार होणारी आरती यापुढेही ध्वनीक्षेपकांवरूनच करण्यात यावी. याबाबत आमच्या भावना लक्षात घेवुन प्रशासनाने योग्य ती दखल घेवून कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.

या निवेदनावर अहमदभाई जहागिरदार, मुख्तार शहा, मुजफ्फर शेख, मेहबुबभाई कुरेशी, रियाज पठाण, यासीनभाई सय्यद, रमजान शहा हैदर शहा, अहमदशहा सिकंदरशहा, फय्याज कुरेशी, अहमदभाई पठाण, रज्जाक पठाण, ताराचंद रणदिवे, राहुल लिहिणार, बदर बनेसाहब शेख, अकबर वजीर शेख आदींच्या सह्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com