शिर्डीत आरटीओ व वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई

एकच दिवसात लाखोंचा दंड वसूल
शिर्डीत आरटीओ व वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शहरात सुरू असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शिर्डी वाहतूक शाखा व श्रीरामपूर येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाने मंगळवार 13 सप्टेंबर रोजी शिर्डी शहरात मोठी कारवाई केली, अवैध प्रवासी वाहतूक विना कागदपत्र प्रलंबित असलेले वाहनावरील दंड, वाहन नावावर नसणे, लायसन्स व इन्शुरन्स नसणे तसेच अवजड वाहतूक करणारी वाहणे, खासगी बस, खासगी वाहतूक करणार्‍या साईभक्तांची वाहने यांच्यावर मोठा फौजफाटा घेऊन कारवाईला सुरूवात करण्यात आल्यानंतर शिर्डी शहरातील अनेक वाहने रस्त्यावरून सामसूम झाल्याचे चित्र दिसत होते.

साईभक्तांचे होणारे शोषण थांबवा, अवैध प्रवासी वाहतूकला शिस्त लावा. या व्यवसायाच्या माध्यमातून वाढत असलेल्या गुंडगिरीला लगाम लावा याकडे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांच्यासमवेत झालेल्या अधिकार्‍याच्या बैठकीत कठोर आदेश दिले होते. त्या अनुषंगाने वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी, मदतनीस यांची मोठी मदत घेऊन कारवाई सुरू होताच अनेक वाहने रस्त्यावरून बेपत्ता झाली. त्यात मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई देखील केली गेली.

ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उर्मिला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विनोद घनवट, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक धनंजय गावित, रोशनी डांगे, मयुर मोकळ यांनी भाग घेत 19 अवैध प्रवाशी वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई केली. तसेच 138 इ चलन कारवाई करुन 1 लाख 50 हजार दंड करण्यात आला. रोख 46 हजार दोनशे दंड वसूल करण्यात आला. आरटीओने केलेल्या कारवाईत 2 लाख 4500 दंड करण्यात आला.

या कारवाईमुळे रस्ते अडवून चलो शिंगणापूर, नाशिक दर्शन असा आवाज देऊन बेशिस्त वाहणे उभी करणारे अनेक एजंट तसेच चालक व मालक यांनी चांगलाच धसका घेतला असून शिर्डीत शिस्तीचे आणि शांततेच्या वातावरणामुळे अनेक भाविकांनी तसेच शिर्डी ग्रामस्थांनी वाहतूक पोलीस प्रशासनाला धन्यवाद देऊन कौतुक केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com