शिर्डीतून लढायचे, पण पडायचे नाही

रामदास आठवले || ‘त्या’ निर्णयामुळे उध्दव ठाकरे यांच्यावर पश्चातापाची वेळ
रामदास आठवले
रामदास आठवले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

2019 च्या निवडणुकीत राज्यातील जनतेने शिवसेना व भाजपला मतदान केले होते. परंतु निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी दोन्ही काँग्रेसला साथ देणे पसंत केले. त्यांच्या या निर्णयाने त्यांच्यावर आज पश्चातापाची वेळ आली आहे, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी येथे केला. तसेच यावेळेस शिर्डीत लढायचे, पण पडायचे नाही असेही आठवले म्हणाले.

नगर जिल्ह्याच्या खाजगी दौर्‍यावर आले असताना येथील शासकीय विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आठवले म्हणाले, उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवर अधिकार सांगण्याचा अधिकार नाही. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्व जनतेचे आहेत. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी आहे. त्यांनाच धनुष्यबाण चिन्हही मिळणार आहे, असे सांगून आठवले म्हणाले पाच वर्षे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना त्यावेळी त्यांनी घेतलेले निर्णय उद्धव ठाकरेंच्या सरकारने रद्द केले होते.

मुळात 2019 च्या निवडणुकीत जनतेने युतीला मतदान केले होते. तरीही ठाकरे हे दोन्ही काँग्रेसबरोबर गेले. त्यामुळे आज त्यांच्यावर पश्चातापाची वेळ आली आहे असे दिसते, असेही आठवले म्हणाले.

केंद्रीय मंत्रीपदाच्या माध्यमातून नगर व शिर्डी येथे मोठे औद्योगिक प्रकल्प आणण्याचा घोषणा केली. त्या अनुषंगाने पुढे बोलताना, ते म्हणाले, शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मी 2024 मध्ये लढण्यास इच्छुक आहे. यावेळेस लढणार आहे व पडणार नाही, असे आवर्जून स्पष्ट करून ते म्हणाले, 2009 मध्ये नगरची जागा राष्ट्रवादीने बाळासाहेब विखेंना दिली नाही. त्यामुळे त्यांनी त्यावेळी शिर्डीत फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे मला पराभव पत्करावा लागला व राज्यसभेचे सदस्य व्हावे लागले. परंतु आता मी 2024 च्या निवडणुकीत शिर्डीमधूनच उभा राहणार असून येथून चांगल्या मतांनी निवडून येईल असा मला विश्वास आहे असे ते म्हणाले.

गडकरी यांच्याकडे मोठ्या जबाबदारीची शक्यता

गडकरींना नवीन जबाबदारी मिळेल असे सांगून आठवले म्हणाले, गडकरी हे देशातील मोठे नेते आहेत. भाजपने त्यांना दोन वेळा राष्ट्रीय अध्यक्ष केले आहे. त्यांनी देशभरात रस्त्यांचे उत्कृष्ट जाळे निर्माण करून त्यांनी कामाचा ठसा उमटवला आहे. भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीत राज्यातून एकच नाव द्यायचे असते. त्यामुळे यंदा देवेंद्र फडणवीस यांचे नाव दिल्याने गडकरींचे नाव वगळले असावे. परंतु त्यांना यापेक्षाही मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यांचे महत्त्व पक्ष कायम ठेवेल असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला.

भानगडी करणारे धोक्यात

देशात कुठेही लोकशाही धोक्यात नाही. जे भानगडी करतात त्यांच्या मागे ईडी चौकशी लागते. त्यांनी ईडीला पेपर दाखवावेत. इन्कमटॅक्स व सर्व कर भरावेत. विरोधकांमागेे ईडी चौकशी लावल्याचा आरोप खोटा आहे. भाजपचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असा दावा करून आठवले म्हणाले, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पडल्याने बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली, असे म्हणण्यात तथ्य नाही. नितेशकुमार यांचा असे डावपेच खेळण्याचा स्वभाव आहे. या आधीचे लालूप्रसाद यादवांबरोबर होते, नंतर भाजप बरोबर आले व आता पुन्हा राष्ट्रीय जनता दलाबरोबर गेलेत. दोन वर्षात ते पुन्हा भाजपमध्ये येऊ शकतात, असे सांगून आठवले म्हणाले पंतप्रधान पदासाठी नितीशकुमार लालूप्रसाद यादव, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, स्टॅलिन, चंद्रशेखर राव, शरद पवार असे अनेक चेहरे पुढे आणले जात असले तरी पंतप्रधान पद मिळवणे सोपे नाही. एनडीए खूप स्ट्राँग आहे आणि भाजप मित्र पक्षांना संपवत नाही तर मित्रपक्ष भाजपला धोका देतात. माझा छोटा पक्ष असूनही केवळ भाजपमुळे तो देशात वाढत आहे असा दावाही आठवणी यांनी केला.

गेहलोत यांनी माफी मागावी

दरम्यान राजस्थानमध्ये दलितांवरील अत्याचार वाढले असून तेथील मुख्यमंत्री अशोक गेहलोत चुकीचे वक्तव्य करीत आहेत. केवळ राजस्थानमध्येच नाही तर देशात दलित अत्याचार वाढल्याचा त्यांचा दावा चुकीचा आहे व त्याबद्दल त्यांनी दलितांची माफी मागावी, अशी मागणी करून येत्या 20 ऑगस्ट रोजी मी राजस्थान जाणार असून तेथे होत असलेल्या दलित अत्याचाराची माहिती घेणार आहे असेही आठवले म्हणाले.

मारो अभी छक्के

राज्यातील नव्या सरकारवर टीका करतांना विरोधकांकडून 50 खोके, बाकी सब ओके अशी टीका केली जात आहे. यावर बोलताना आठवले म्हणाले, मारो अभी छक्के. जाणून बुजून नव्या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. 40 आमदार व 12 खासदार एका बाजूला आणणे हा बच्चों का खेळ नाही. जबाबदारीने काम केले पाहिजे, बोलले पाहिजे. शिवसेनेने आधी भाजपला धोका दिला, पण भाजपने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला नाही तर फक्त मोठा धक्का दिला. त्यामुळे विरोधकांचे आरोपात तथ्य नाही. ठाकरेंना त्यांचे आमदार सांभाळता आले नाहीत. त्यामुळे आता अडीच वर्षे हे सरकार प्रभावी काम करेल व 2024 मध्ये देशात एनडीएच्या साडेचारशे जागा येतील व राज्यातही युतीचे सरकार येईल असा दावा आठवले यांनी केला.

पुनर्विचार याचिका करणार

मी मंत्री असताना भूमिहीन लोकांना पाच एकर जमीन देण्याची योजना आणली होती. सर्वधर्मीय लोकांना त्याचा फायदा झाला. त्यावेळी मी साडेतीन लाख एकर जमीन वाटली होती. परंतु न्यायालयाने आता ही जमीन काढून घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, याबाबत सर्वोच्च न्यायालयात पूनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे सांगून आठवले म्हणाले, आचार्य विनोबा भावे यांनी भू दान चळवळ देशात राबवली. तशी नवी चळवळ आता राबवण्याची गरज आहे. गरिबांना हक्काची जमीन मिळाली तर शहराकडे येणारा लोंढा थांबेल व या कुटुंबांनाही शेतीपूरक व्यवसायातून स्थिरता येऊ शकेल असा विश्वासही आठवणी यांनी व्यक्त केला.

राज्याच्या सत्तेत वाटा मागणार

राज्यातील नव्या सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपद व राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये एक आमदारकी तसेच दोन-तीन महामंडळांवर अध्यक्षपद मिळण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मंत्रिमंडळाच्या सप्टेंबरमध्ये होणार्‍या विस्तारात विचार करण्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली आहे. तरीही त्यांना पुन्हा एकदा लवकरच भेटून ही मागणी करणार आहे, असे आठवले यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com