साई
साई|desibantu
सार्वमत

राम मंदिरासाठी शिर्डीच्या साई मंदिराचे जल आणि माती रवाना

Arvind Arkhade

शिर्डी|प्रतिनिधी|Shirdi

आयोध्येतील रामजन्मभूमी येथे 5 ऑगस्ट रोजी भूमिपूजन होत आहे. यासाठी शिर्डीच्या साईबाबा मंदिरातील पवित्र जल, साईनगरीची माती आणि बाबांची उदी राम मंदिराच्या पायभरणीसाठी मागवण्यात आली आहे.

विश्वहिंदू परिषदेच्या वतीने काल सकाळी साईमंदिराच्या प्रवेशद्वार क्रमांक चार समोर या सामुग्रीची विधिवत पूजा करण्यात आली असून रामंदिरचे कार्य निर्विघ्न पार पडावे यासाठी साईबाबाकडे प्रार्थना केली असल्याचे विश्वहिंदू परिषदेचे राहाता तालुका प्रखंडमंत्री सुरेंद्र महाले यांनी यावेळी सांगितले.

साईबाबा समाधी मंदिराच्या प्रवेशव्दार क्रमांक चार समोरील प्रांगणात हिंदू बांधवांच्या वतीने प्रातिनिधीक स्वरूपात माती आणि साईजलाचे पूजन करण्यात आले. एका ताम्रकलशात मातीची आणि मंदिरातील पवित्र जलाचे वैभवशास्त्री रत्नपारखी आणि शेखर कुलकर्णी यांनी मंत्रोच्चार करून पूजन केले.

प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या भूमिपूजनचा मुहूर्त जवळ आला असून श्रीरामभक्तांसाठी ही अनोखी पर्वणी आहे. रामभक्त अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करत असून आज तो सुवर्णदिन जवळ आल्याने राममंदिर निर्माण कार्य निर्विघ्न पार पडावे यासाठी साई दरबारची पवित्र माती, जल आणि साईबाबांची उदी पाठवत असल्याचे सुरेंद्र महाले यांनी सांगितले.

यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे सचिन तांबे, शुभम ताम्हणे, शुभम मुर्तडक, दत्तू झाकणे, आकाश त्रिपाठी, संदीप सोळशे, योगेश मखाना, अरुण हजारे, शुभम नाणेकर, दुर्गेश गाडेकर, परदेशी तसेच सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते. शिर्डी व तालुक्यातील श्रीराम भक्त, यापूर्वी अयोध्या आंदोलनात सहभागी झालेले कार्यकर्ते उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com