शिर्डी रामनवमी उत्सवात दोन गटाचे दोन अध्यक्ष

नगरपरिषदेच्या निवडणुकीपूर्वीच यात्रा उत्सवात दोन गट आमने-सामने || ग्रामस्थांमध्ये संभ्रम, एका गटाकडून वारुळे तर दुसर्‍या गटाकडून शिंदे यांची निवड
शिर्डी रामनवमी उत्सवात दोन गटाचे दोन अध्यक्ष

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

रामनवमी उत्सवासाठी शिर्डीत प्रथमच दोन गटाने दोन अध्यक्षांची निवड केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून नगरपरिषद निवडणूक पूर्वीच शिर्डीत यात्रा उत्सवात दोन गट आमने सामने आल्याने शिर्डीत उत्सवासाठी दोन अध्यक्ष निवडीच्या चर्चेला उधाण आले आहे.

साईबाबांच्या हयातीपासून दरवर्षी रामनवमी उत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा करण्याची परंपरा आहे. यासाठी ग्रामस्थांमधून उत्सव समितीचा अध्यक्ष निवडला जात असताना आता यंदाच्या उत्सव समितीसाठी दोन अध्यक्ष दोन गटांनी निवडले आहेत. त्यात एका गटाने संजय शिंदे तर दुसर्‍या गटाने दीपक वारुळे यांची अध्यक्षपदी निवड जाहीर केली आहे. दोन अध्यक्षांच्या निवडीमुळे उत्सव समितीत दोन वेगवेगळे गट पडलेले दिसून आले आहे.

पहिल्या गटाची बैठक रविवारी ज्ञानेश्वर गोंदकर यांच्या निवासस्थानी झाली. त्याप्रसंगी माहिती देताना अध्यक्ष संजय शिंदे म्हणाले की, रविवारी शिर्डीत ग्रामस्थांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी शिर्डी ग्रामस्थांना निमंत्रित करण्यात आले होते. काही ग्रामस्थ उपस्थिती होते तर काही नव्हते. गेल्या काही वर्षांपासून ग्रामस्थांनी असे ठरवले होते की, गावातील सर्व आडनावाच्या आणि प्रभावी व्यक्तीला उत्सव समितीमध्ये काम करण्याची संधी दिली जाणार होती. त्यानुसार कोते, गायके, यांना संधी देण्यात आली होती. म्हणून रविवारी झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत माझी निवड करण्यात आली. याप्रसंगी अभय शेळके, शिवाजी गोंदकर, रमेश गोंदकर, सुधाकर शिंदे, बाबासाहेब कोते, अशोक गोंदकर, सचिन शिंदे, सचिन कोते, विजय जगताप, सचिन चौगुले, अमृत गायके, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

दुसर्‍या गटाची बैठक सोमवारी सकाळी हॉटेल सिटी हार्ट येथे संपन्न झाली. यावेळी अध्यक्ष दीपक वारुळे म्हणाले की, शिर्डीच्या काही ग्रामस्थांना टाळून त्या गटाने बैठकीचे आयोजन केले. त्यांचा अध्यक्ष निवडीचा कट हा पूर्वनियोजित होता. या बैठकीसाठी मावळते अध्यक्ष कमलाकर कोते यांना ही बोलवले नाही. त्यामुळे त्यांनी निवडलेला अध्यक्ष हा ग्रामस्थांच्या एकमताने निवडला गेला नाही. मात्र एक अध्यक्ष निवडला जावा, यासाठी ना. राधाकृष्ण विखे पाटील व खा. सुजय विखे पाटील यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ, यावेळी कमलाकर कोते यांनी पूर्वहिशोब देखील सादर केला.

तर कार्याध्यक्ष म्हणून जगन्नाथ गोंदकर यांचीही निवड करण्यात आली आहे, असे वारुळे म्हणाले. अध्यक्ष निवडीच्या बैठकीसाठी कैलासबापू कोते, कमलाकर कोते, नितिन कोते, अरविंद कोते, दत्ता कोते, सचिन तांबे, निलेश कोते, ताराचंद कोते, अँड अनिल शेजवळ, उत्तम कोते , हिरामण वारूळे, अशोक कोते, पंडित शेळके, दत्तात्रेय कोते,अप्पासाहेब कोते, मुकुंद गोंदकर,यादवराव कोते, नानासाहेब काटकर हरी बनकर बद्रीनाथ लोखंडे, संदीप पारख, गोकुळ ओसवाल, दीपक नागरे, अँड विक्रम वाकचौरे, केशवराव गायके, राजेंद्र कोते, मनोज वाघ, राकेश कोते, हैशीराम कोते, सर्जेराव कोते, नंदू शेळके केशव जाधव, प्रसाद सुरंगे, संजय बनकर, साईराज कोते, बापू ठाकरे, खंडू गोरडे, राजेंद्र पवार, बाळासाहेब नागरे, देवानंद शेजवळ, आदीसह ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते.

शिर्डी रामनवमी उत्सव समितीत प्रथमच धार्मिक कार्यक्रमात दोन गट पडल्याने यात्रा उत्सव कमिटीचे दोन अध्यक्षांची निवड दोन्ही गटाकडून करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यात्रा उत्सवाची वर्गणी कुणाकडे द्यायची असा ग्रामस्थांना निर्माण झाला असून या धार्मिक उत्सवाला राजकीय वळण न देता दोन्ही गटाच्या नेत्यांनी समन्वयाने हा प्रश्न मिटवावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात असून दोन्ही गटाचे नेते अध्यक्ष निवडीवर काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पूर्वी कधीही शिर्डीत रामनवमी उत्सव समिती निवडीवरून वादावादी झालेली नाही. हा उत्सव साईबाबा, साईभक्त आणि ग्रामस्थ यांच्यासाठी असून या उत्सवाला परंपरा आहे. दरवर्षी हा उत्सव मोठ्या एकोप्याने साजरा केला जात असतो. यंदाही एकजुटीने आणि एकमताने रामनवमी उत्सव साजरा होण्याकरिता दोन्ही गटाने एकमेकांबरोबर समन्वय साधून उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करावा अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे .

माझा प्रपंच वर्गणीवर चालत नाही. साईसमाधी शताब्दी महोत्सव वर्षात गंगागीरी महाराज यांचा 171 वा हरिनाम सप्ताह सर्व समाजातील लोकांना सहभागी करून ऐतिहासिक करवून दाखवला.त्याचा हिशोब अहवाल पुस्तीका प्रसिद्ध करून वर्गणीदार यांच्या घरोघरी पोहच केली आहे.यानंतर 111 वा ऐतिहासिक रामनवमी उत्सव साजरा करून गिनीज बुकमध्ये नोंद झाली.या दरम्यान झालेल्या वर्गणीपैकी 21 लाख रुपयांचा पैशाचा हिशोब हा साई संस्थानच्या अधिकार्‍यांकडे आहे. उर्वरीत आठ लाख रुपयांपैकी सहा लाख रुपये खर्च झाले आणि दोन लाख रुपये शिल्लक राहिले आहेत. काही जण मनाने नाही तर द्वेषाने एकत्र आले आहेत.

- कमलाकर कोते, माजी अध्यक्ष, रामनवमी उत्सव, कमिटी

रामनवमी उत्सव साईबाबांनी सुरू केला आहे. त्यांनी दिलेला श्रद्धा सबुरीचा संदेश आम्ही पाळतो. परंतु नेतृत्व करणार्‍यांनी सर्वांना बरोबर घ्यावे. आमचा व्यक्तिगत कोणावर आरोप नाही. रविवारी आयोजित केलेल्या अध्यक्ष निवडी बैठकीबाबत सर्वांना निरोप दिला होता. मागील वर्षाचा हिशोब देणे हे अध्यक्षांचे कर्तव्य आहे. याबाबत काहींनी विनाकारण गैरसमज करून घेतला. सर्वांना बरोबर घेऊन रामनवमी उत्सव साजरा करावा.

- शिवाजी गोंदकर, माजी नगराध्यक्ष

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com