शिर्डीच्या पश्चिम भागात घरात पाणी

शिर्डीच्या पश्चिम भागात घरात पाणी

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डीच्या पश्चिम भागात अती पर्जन्यवृष्टी झाल्याने शहरातील नाल्याला प्रचंड पूर आला असून

आंबेडकरनगर, सीतानगर, लक्ष्मी नगरमधील रहिवाशांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने येथील रहिवाशांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी पाहणी करत बंदिस्त नाला तातडीने उकरून पाण्याचा प्रवाह मोकळा करण्याचे आदेश दिल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.

राहाता तसेच कोपरगाव तालुक्यातील पश्चिम भागात अतिवृष्टी झाल्याने सर्व पाणी नाले, ओढ्याच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर वाहत येऊन शहरातील सितानगर, आंबेडकर नगर, लक्ष्मीनगरच्या नाल्यात येऊन पोहचल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

शिर्डी नगरपंचायतच्यावतीने सदरील नाल्याचे रुंदीकरण करण्यात आल्याने येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असला तरीदेखील मात्र रेवा रेसिडेन्सी ते हॉटेल सन अ‍ॅण्ड सॅन्ड दरम्यान नाला बंदिस्त करून अरुंद केल्याने पाणी जाण्यास अडथळा निर्माण झाला असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

यावेळी प्रांताधिकारी शिंदे यांनी तातडीने सदरची पहाणी करत बंदिस्त नाला जेसीबीच्या सहाय्याने उकरून काढण्यासाठी आदेश दिल्याने पाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र भविष्यात शहरात पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये.

यासाठी निघोज ग्रामपंचायत हद्दीतील सदरचे बंदिस्त नाल्याशेजारील हॉटेल यांची बांधकाम परवानगी तसेच पार्किंग आणि ओपन स्पेस सोडला आहे का हे देखील बघणे गरजेचे ठरणार आहे.

यावेळी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, बीडीओ समर्थ शेवाळे, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, नगरसेवक जगन्नाथ गोंदकर, शिवसेना नेते कमलाकर कोते, नगरसेवक अभय शेळके, शिवाजी गोंदकर, सुजित गोंदकर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश गोंदकर, तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे, भाजपचे रवींद्र गोंदकर, दीपक वारुळे, गोपीनाथ गोंदकर आदी मान्यवर उपस्थित होते.

निघोज ग्रामपंचायत हद्दीतील राष्ट्रवादीचे संदीप सोनवणे यांचे घर पूर्णपणे पाण्यात आहे. यावेळी त्यांच्या घराची पहाणी करण्यात आली. यावेळी उपस्थित शिर्डी ग्रामस्थांनी सदरचा बंदिस्त नाला हा ओपन करून नकाशाप्रमाणे रुंदीकरण करण्यात यावा, अशी मागणी प्रांताधिकारी श्री. शिंदे यांना केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com