
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
भारतीय रेल्वेने रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मुंबईतील स्थानकांचा समावेश आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील दादरसह 7 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. तर राज्यातील शिर्डी, पुणे, नाशिक, नांदेड, अमरावती, भुसावळ या प्रमुख रेल्वे स्थानकांचाही कायापालट होणार आहे.
भारतीय रेल्वेने स्टेशनला नवा लूक देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन चकाचक आणि बेस्ट दिसणार आहेत. मुंबई सेंट्रल, ठाणे, नागपूर, अजनी, जालना आणि औरंगाबाद रेल्वेस्थानके यापूर्वीच मेजर अपग्रेडेशन ऑफ स्टेशन्स पुनर्विकासासाठी हाती घेतली गेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाला आर्थिक व्यवहारासंबंधीच्या कॅबिनेट कमिटीने यापूर्वीच मंजुरी दिलेली आहे.
राज्यातील 108 रेल्वेस्थानकांचा यापूर्वीच आदर्श स्थानकांच्या योजनेत विकास करण्यात आलेला आहे. देशभरात आदर्श रेल्वे स्थानक योजनेत 1552 स्थानकांची निवड करण्यात आली. त्यापैकी 1218 स्थानकांचा विकास करण्यात आला आहे. उर्वरित स्थानकांचा जून 2023 पर्यंत विकास करण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकांचा कायपालट करण्यात येणार आहे. त्यासाठी नव्या ग्राहक सुविधा योजनेत महाराष्ट्राला रेल्वेकडून मोठा वाटा मिळाला आहे. चार वर्षांत 2494 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय.
या स्थानकांचा होणार कायापालट
मुंबईतील अंधेरी, बांद्रा टर्मिनस, बोरिवली, दादर, कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस यांचा समावेश आहे. तर पुणे, लोणावळा, मिरज, भुसावळ, नांदेड, नाशिक रोड, साईनगर शिर्डी, शिवाजीनगर पुणे, ठाकुर्ली, अमरावती, अकोला, वर्धा रेल्वेस्थानकांचा पुनर्विकासासाठी अभ्यास करण्यात येणार आहे.