शिर्डीत मंगळवारी जनता कर्फ्यू

दररोज सकाळी 8 ते 6 वाजेपर्यंत व्यवसाय सुरु
शिर्डीत मंगळवारी जनता कर्फ्यू

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

जिल्ह्यात अनलॉक सुरु होऊन आज सहा दिवस झाले आहे. मात्र शिर्डी शहरातील व्यावसायिकांनी आपली दुकाने दररोज किती वाजेपर्यंत सुरू ठेवावी याबाबत निर्णय घेतलेला नव्हता. या पार्श्वभूमीवर कोविडचा संभाव्य धोका टाळण्यासाठी शिर्डी नगरपंचायतने काल सकाळी शहरातील व्यापार्‍यांची बैठक घेऊन अत्यावश्यक सेवा वगळता प्रत्येक मंगळवारी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू तसेच इतर दिवशी दररोज सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत शहरातील व्यवसाय सुरू ठेवावे, असा सर्वानुमते निर्णय नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर व मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.

शिर्डी शहरातील व्यवसायिकांनी नियमित वेळेनुसार दुकाने सुरू केली होती. काही ठिकाणी रात्री उशिरा दुकाने बंद केले जात होते तर दुकाने किती वाजता खुली करावी आणि बंद कधी करावी याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. याबाबत शनिवार दि. 12 रोजी दुपारी शिर्डी नगरपंचायतच्या वतीने नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील व्यवसायिकांची नगरपंचायतीच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी होलसेल व्यापारी वर्गासह छोटे मोठे किराणा दुकानदार, भाजीवीक्रेते, फळविक्रेते उपस्थित होते.

यावेळी मुख्याधिकारी श्री. डोईफोडे यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये दैनंदिन व्यवसायिकांनी आपले व्यवसाय पूर्वीप्रमाणे वेळेनुसार सुरू करावे मात्र स्थानिक पातळीवर परिस्थिनुसार व्यापार्‍यांशी विचारविनिमय करून हा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर म्हणाले की, कोविडचा प्रादुर्भाव जरी कमी झाला असला तरीदेखील संभाव्य धोका लक्षात घेता काळजी म्हणून काही काळ नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

साईमंदीर बंदच आहे. व्यापार्‍यांनी काही सुचना केल्या. त्या सुचनांचा आदर करून व्यापार्‍यांनी प्रतिसाद देत शहरातील दुकाने सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. सायंकाळी सहा वाजेनंतर हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये पार्सल सेवा सुरू राहणार असल्याचे सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com