
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू 7 जून शुक्रवारी साईसमाधी दर्शनासाठी शिर्डीत येत असून शिर्डीत येणार्या त्या सहाव्या राष्ट्रपती आहेत. त्यांच्या स्वागतासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.
शिर्डीत यापूर्वी निलम संजीव रेड्डी, शंकरदयाळ शर्मा, प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी व रामनाथ कोविंद यांनी साईदर्शनाच्या निमित्ताने शिर्डीला भेट दिलेली आहे. 7 जून शुक्रवारी राष्ट्रपती मुर्मू विशेष विमानाने दुपारी मध्यान्ह आरतीपूर्वी शिर्डी साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होणार आहेत.
राष्ट्रपती जवळपास तीन तास शिर्डीत उपस्थित राहणार आहेत. मध्यान्ह आरतीला हजेरी लावून त्या साईसमाधीवर पाद्यपूजा करणार आहेत. त्यानंतर साईबाबांच्या आगमनाची स्मृती जपणार्या गुरुस्थान मंदिर व निंब वृक्षाला भेट देऊ शकतात. त्यानंतर बाबांच आयुष्यभर जेथे वास्तव्य घडलं त्या सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेल्या द्वारकामाईतही त्या नतमस्तक होणार असल्याचेही सांगण्यात येते.
साईबाबांनी वापरलेल्या वस्तू, कपडे, पादत्राणे, रथ, पालखी, साईबाबांच्या ओरीजनल प्रतिमा जतन करून ठेवण्यात आलेल्या साईबाबा वस्तुसंग्रहालयालाही त्या भेट देण्याची व साईबाबांचे जीवनचरित्र समजावून घेण्याचीही शक्यता आहे. यानंतर त्या साईसंस्थानच्या प्रसादालयात भोजन करणार आहेत. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी 7 जानेवारी 2009 रोजी या प्रसादालयाचे उद्घाटन केलेले आहे.
राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, साईसंस्थान व शिर्डी नगरपरिषदेकडून जय्यत तयारी सुरू आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, साईसंस्थानचे सीईओ पी. शिव शंकर, नगरपरिषद मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी दौर्याच्या नियोजनात अखंड व्यस्त आहेत़
राष्ट्रपतींच्या दौर्यात त्यांच्या स्वागतासाठी राज्यपाल रमेश बैस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे व खासदार डॉ. सुजय विखे पाटील उपस्थित राहणार असल्याचे कळते. शुक्रवारी राष्ट्रपती यांचा दौरा शिर्डी येथे असल्यामुळे शिर्डी शहरातील मुख्य रस्त्यांची डागडुजी, दुभाजकांची रंगरंगोटी, स्वच्छता, शासकीय विश्रामगृह, प्रसादालय आदी ठिकाणी कामे जलदगतीने सुरू आहेत.