साईंच्या नगरीत नेतेमंडळी करोनाच्या विळख्यात
सार्वमत

साईंच्या नगरीत नेतेमंडळी करोनाच्या विळख्यात

Arvind Arkhade

शिर्डी|शहर प्रतिनिधी|Shirdi

जागतिक किर्तीचे देवस्थान म्हणून नावारूपास आलेल्या साईबाबांच्या शिर्डीत हळूहळू करोनाने शिरकाव केला असून शहरात करोनाची शतकाकडे वाटचाल होताना दिसून येत आहे. दरम्यान साईंच्या या मायानगरीत आता राजकीय नेतेमंडळी देखील करोनाच्या विळख्यात सापडले असून माजी नगराध्यक्षांना करोनाची बाधा झाली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला, त्यानंतर गेली चार महिने आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी साईनगरीत औषधालाही करोनाचा रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे शिर्डी शहरातील नागरिकांच्या मनातील भीती नष्ट झाली आणि नागरिक घराबाहेर विनाकारण मुक्तसंचार करू लागले.

यादरम्यान आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन आणि नगरपंचायतीच्या वतीने वारंवार सूचना देखील केल्या व दंडात्मक कारवाई केली, मात्र नागरिकांनी या कारवाईला न जुमानता विनाकारण बाहेर पडणे सुरूच ठेवले, त्याचे पडसाद मागील पंधरा दिवसांपासून शहरात दिसू लागले आहे शहरात एक एक रुग्ण दररोज वाढत जात असून आता हा आकडा 80 च्या वरती जाऊन पोहोचला असून करोनाची शतकाकडे वाटचाल होताना दिसून येत आहे. यामध्ये सर्वसाधारण नागरिकांसह राजकीय नेते मंडळी सुद्धा करोनाच्या विळख्यात सापडली आहे.

शहरात आता बाधित लोकांबरोबर राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही करोनाची बाधा झाल्याने अनेकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन ज्येष्ठ नेत्यांना बाधा झाल्याचे वृत्त शहरात वार्‍यासारखे पसरताच त्यांच्या संपर्कातील कार्यकर्त्यांनी धसका घेतला आहे. त्यामुळे करोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे.

संपर्कात येणार्‍या लोकांनी स्वतःहून पुढे येऊन आपली नावे सांगावे जेणेकरून करोनाची साखळी तुटण्यास प्रशासनाला मदत होईल असे आवाहन नगरपंचायतीच्या वतीने करण्यात येत आहे. नगर पंचायतीच्या वतीने नोडल अधिकारी मुरलीधर देसले व अग्निशमन दलाचे श्री लासुरे या दोन्ही अधिकार्‍यांनी करोना व्हायरसचा प्रादुर्भाव शहरात वाढू नये यासाठी अथक परिश्रम घेत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com