शिर्डी पोलिसांनी जप्त केलेल्या 4 वाहनांची चोरी

शिर्डी पोलिसांनी जप्त केलेल्या 4 वाहनांची चोरी

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी पोलिसांनी डंपर, इंडिका व दोन रिक्षा जप्त करून शिर्डी नगरपरिषदेच्या पाणी साठवण तलावाच्या आवारात ठेवले होते. त्या जप्त करून ठेवलेल्या या चार वाहनांची चोरी झाल्याने अज्ञात आरोपीं विरोधात शिर्डी पोलीस निरीक्षक यांनी गुन्हा दाखल केला असून चक्क नगरपरिषदेच्या आवारातून ही वाहने चोरी गेल्याने या घटनेबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शिर्डी पोलीस स्टेशन इमारती, कार्यालय व निवासस्थानचे काम सुरू केले जाणार असल्याने 8 एप्रिल 2023 रोजी लोणी पोलिस स्टेशन हद्दीतील आरटीओ, महसूल व पोलीस कारवाईतील वाहने शिर्डी पोलीस स्टेशन आवारात लावण्यात आली होती. मात्र तेथे तांत्रिक जागेची अडचण असल्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार शिर्डी नगरपंचायत हद्दीतील नादुर्खी पाटाजवळ मोकळ्या जागेत लावण्यात आली. त्यात परमीट डंपर एमएच 12 इएफ 4917 किमत 2 लाख 50 हजार, इंडिका कार एमएच 12 एफ 3500, किंमत 20 हजार, जुनी रिक्षा एमएच 17 एल 318 किमत 5 हजार व जुनी एक रिक्षा किंमत 2 हजार अशी 2 लाख 77 हजार किंमतीची चार वाहने शासकीय जागेवर लावण्यात आली होती.

डंपरचे मालक प्रंशात बाबासाहेब कोते यांनी राहाता तहसील कार्यालयात दंडाची रक्कम भरून जप्त केलेले वाहन सोडवण्यासाठी 21 सप्टेंबरला ज्या ठिकाणी वाहने लावली होती. त्या ठिकाणी जाऊन शोधाशोध केली असता वाहने मिळुन आली नाही. या बाबतची माहिती पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ यांना दिली. कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी शासकीय मालमत्तेचे अपहरण करून चोरुन नेले अशी फिर्याद शिर्डी पोलीस स्टेशन मधील महिला कर्मचारी रुपाली अनिल राजगिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भादंवी 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक शिरसाठ करीत आहे.

शासकीय जागेत ठेवण्यात आलेल्या चार वाहनांची चोरी झाल्यामुळे नागरिकांकडून या घटनेचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांची चोरी झाल्याने या घटनेने वाहन धारकांमध्ये खळबळ उडाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com