शिर्डीतील ऑक्सीजन प्लॅन्ट आजपासून सुरू

मुख्यमंत्री ठाकरे करणार व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शुभारंभ
शिर्डीतील ऑक्सीजन प्लॅन्ट आजपासून सुरू

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

श्री साईबाबांच्या शिर्डी नगरीत रिलायन्स उद्योग समुहाच्या माध्यमातून सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणारी 1200 एल.पी.एम.क्षमता असलेली प्रणाली (पीएसए) बसविण्याचे काम अखेर पूर्ण झाले असून आज मंगळवारी दुपारी 12.30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शुभारंभ करण्यात येणार असल्याचे संस्थानकडून सांगण्यात आले.

साईबाबा संस्थानच्या साईनाथ रुग्णालय शेजारच्या हवेने ऑक्सिजनची निर्मिती करणारा हा प्लान्ट करोनाग्रस्त रुग्णांसाठी जीवदान ठरणार असून या ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते पार पडणार आहे. या कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्ह्यातील खासदार तसेच सर्व आमदार उपस्थित राहाणार आहेत.

करोनाच्या दुसर्‍या लाटेत जिल्ह्यातील रुग्णालयांना ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत असल्याने करोनाग्रस्त रुग्णांना समस्यांचा सामना सहन करावा लागला. देशविदेशात नावलौकिक मिळवलेल्या श्री साईबाबा संस्थानच्या साईबाबा आणी साईनाथ रुग्णालयात करोनाबाधीत रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याने साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी रिलायन्स समुहाशी संपर्क साधून हवेतून आँक्सिजन निर्माण होणार्‍या प्लांटबाबत चर्चा केली आणि त्यांनी तातडीने होकार दर्शवित सुमारे दोन कोटी रुपये खर्च असलेल्या 1200 एल.पी.एम. क्षमतेच्या पी.एस.ए.प्रोजेक्टसाठी पुढाकार घेतला.

साईबाबा विश्वस्त व्यवस्थेच्या साईनाथ रुग्णालयाशेजारच्या जागेवर महिनाभरात कामकाज सुरू करून अखेरीस पूर्ण झाले. साईबाबा संस्थानच्या साईनाथ हॉस्पिटलच्या सुमारे अडिचशे बेडला चोवीस तास आँक्सिजन पुरेल इतका ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होणार आहे. हवेने इन्स्टॉलेशन होणार्‍या या प्लान्टची पहाणी तसेच वारंवार आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बगाटे यांनी घेऊन हा प्रकल्प पूर्ण करून घेतला.

हवेने ऑक्सिजन तयार करणारा हा प्लान्ट कोव्हिड रुग्णांसाठी वरदान ठरेल. या प्रकल्पामुळे आँक्सिजनसाठी आता साईबाबा संस्थानचे वर्षाकाठी कोट्यवधी रुपये वाचणार आहेत. या प्लांटसाठी मात्र अनुभवी टेक्निकल असिस्टंटची गरज भासणार असून संस्थानकडे याकामी अनुभवी कामगारवर्ग आहे की नाही याबाबत अधिक माहिती मिळाली नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com