शिर्डी (शहर प्रतिनिधी) -

शिर्डीतील साईबाबांच्या मंदिर परिसरातील द्वारकामाईसमोर एका व्यक्तीकडून उडविण्यात आलेल्या ड्रोनचे सीसीटीव्ही फुटेज मंदिर

प्रशासनाने जमा करून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मात्र सदर बाब अंगलट येणार असल्याने पोलीस व संस्थान प्रशासन सेवेतील अधिकार्यांना वाचविण्यासाठी संवेदनशील असलेल्या साई मंदिर सुरक्षेच्या विषयी पोलीस कारवाई करताना कानाडोळा करत आहे का? एकीकडे संस्थानचे अधिकारी, पत्रकार व स्थानिक ग्रामस्थांवर तक्रार तसेच गुन्हे दाखल करण्यासाठी तत्परता दाखवत आहे तर दुसरीकडे मंदिर सुरक्षेच्या संवेदनशील विषयाकडे अधिकारी दोन दिवस उलटून देखील कारवाईचा बडगा उचलत नसल्याने या प्रकरणी कोण कोणाला पाठीशी घालत आहे याची उलट सुलट चर्चा शहरात सुरू झाली आहे.

गुरुवारी दुपारी साई मंदिराच्या कळसाला जवळून निळ्या रंगाच्या हेलिकॉप्टरने घिरट्या घातल्या, साई मंदिरावर अशाप्रकारे ड्रोन, चॉपर अथवा वस्तू जवळून उडविण्यासाठी सक्त मनाई आहे. याबाबत नियम आहे. असे असताना त्या हेलिकॉप्टरमध्ये कोण बसून कळसावरून घिरट्या मारल्या याचे रहस्य कायम असतानाच शुक्रवारी द्वारकामाई समोर एका व्यक्तीने ड्रोन उडविल्याची घटना घडली.

यावेळी प्रत्यक्षदर्शी संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांनी सदरील इसमास जाब विचारला. परवानगी नसताना ड्रोन उडविले परंतु घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ड्रोनवाल्याने तेथून काढता पाय घेतला. मात्र दोन दिवसांत दोन घटना घडल्या. एका घटनेदरम्यान नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर हजर होते. मंदिर सुरक्षेसाठी पोलीस तसेच संस्थानची मोठी कुमक मंदिरात कार्यान्वित आहे. असे असताना सदरची यंत्रणा नावालाच आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेल्या साईबाबांचे मंदिर देशात तसेच जगातल्या नकाशावर ख्याती प्राप्त आहे. संवेदनशील मंदिरांमध्ये साईबाबांच्या मंदिराचा समावेश आहे. संस्थानचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु याप्रश्नी अधिकार्यांनी बोलण्यास नकार दिला. कारवाई टाळण्यासाठी कोणाचा दबाव आहे का? मंदिर सुरक्षेशी हा खेळ धोकादायक नाही का असे असंख्य प्रश्न उपस्थित होत असून याविषयी पोलीस व संस्थान अधिकारी काय पावले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

साई मंदिर परिसरातील द्वारकामाई समोरील ड्रोन प्रकरणी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे यांना चौकशीचे आदेश दिले आहे. साईमंदिर सुरक्षा प्रकरणी पोलीस प्रशासन गांभीर्याने लक्ष वेधणार.

- संजय सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी