शिर्डी नगरपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू

शिर्डी नगरपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू
शिर्डी

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून मंगळवार दि. 21 डिसेंबर रोजी नगरपंचायत सदस्य निवडीसाठी मतदान होणार असून बुधवार दि. 22 डिसेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार असल्याची माहिती शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी दिली.

प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. त्यावर आलेल्या हरकतीवर सुनावणी होऊन अंतिम याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रान्वये नगरपंचायत सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुका 2021 च्या निवडणूक कार्यक्रमाचे टप्पे याप्रमाणे असून सोमवार दि. 29 नोव्हेंबर 2021 रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. मंगळवार दि. 30 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी निवडणुकीचा कार्यक्रम जारी करतील. त्यानंतर बुधवार दि. 1 डिसेंबर 2021 सकाळी 11 ते मंगळवार दि. 7 डिसेंबर 2021 दुपारी 2 वाजेपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर उमेदवारांना नामनिर्देशन पत्र भरण्याकरिताचा कालावधी असणार आहे.

बुधवार दि. 8 डिसेंबर सकाळी 11 वाजेनंतर दाखल असलेल्या नामनिर्देशन पत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. सोमवार दि. 13 डिसेंबर 2021 दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र माघारी घेण्यासाठीची मुदत आहे. नामनिर्देशन पत्रासंदर्भात अपील असल्यास वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसांच्या आत जिल्हा न्यायाधीशांकडे अपील करता येईल. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अपिलाचा निर्णय लवकरात लवकर प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे सूचित केले आहे. अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसर्‍या दिवशी किंवा तत्पूर्वी गुरुवार दि. 16 डिसेंबर 2021 पर्यंत याबाबत प्रक्रिया करणे गरजेचे आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर लगतच्या दुसर्‍या दिवशी निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

मंगळवार दि 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी साडेसात पासून ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान होणार आहे. मतदानानंतर लगेच दुसर्‍या दिवशी बुधवार दि. 22 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीस सुरूवात होऊन निकाल जाहीर केले जाणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी दिली.

शिर्डी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण 17 प्रभाग असून 9 ठिकाणी महिला उमेदवार आहेत. उर्वरित सर्वसाधारण ठिकाणी जर काही महिलांंनी उमेदवारी केल्यास महिलांची संख्या अधिक वाढेल व शिर्डी नगरपंचायतमध्ये महिलाराज अनुभवास मिळणार आहे. नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रभागनिहाय तयार झालेल्या प्रारूप मतदार यादी इच्छुक असलेल्या उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी चाळण्यास सुरुवात केली असून त्यात आपले कोण व पराया कोण याचे गणित मांडण्यास सुरुवात केली आहे. या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण 30 हजार 876 मतदार संख्या असून त्यामध्ये 15 हजार 782 पुरुष तर 15 हजार 85 महिला मतदार संख्या आहे. इतर 9 मतदार आहेत.

प्रभागनिहाय मतदार संख्या पुढील प्रमाणे प्रभाग व त्यासमोर कंसात मतदार संख्या प्रभाग क्रमांक 1 (2806), प्रभाग 2 (2589), प्रभाग 3 (2337), प्रभाग 4 (1369), प्रभाग 5 (1127), प्रभाग 6 (1525), प्रभाग 7 (1658), प्रभाग 8 (1184), प्रभाग 9 (1868), प्रभाग 10 (2375), प्रभाग 11 (2042), प्रभाग 12 (1168), प्रभाग 13 (1793), प्रभाग 14 (2817), प्रभाग 15 (1221), प्रभाग 16 (1610), प्रभाग 17 (1387). याप्रमाणे प्रारुप यादीनुसार प्रभाग निहाय मतदार संख्या असून प्रारुप मतदार यादीवर आलेल्या हरकती व सूचना निकाली निघाल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असल्याने यामध्ये काहीसा बदल होऊ शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com