शिर्डी नगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी 7 डिसेंबर रोजी विशेष सभेचे आयोजन

शिर्डी
शिर्डी

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

जिल्ह्यात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या शिर्डीच्या नगराध्यक्षपदाची निवड करण्यासाठी विशेष सभा दि. 7 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 2 वाजता

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले असून पीठासीन अधिकारी म्हणून शिर्डी कार्यालयाचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या शब्दाची पूर्ती होते की दोघांच्या भांडणात तिसर्‍याचा लाभ होणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अर्चनाताई कोते यांनी आपल्या पदाचा राजीनामा दि. 19 नोव्हेंबर 2020 रोजी दिला आहे. शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी उर्वरित कालावधीसाठी रिक्त झालेली जागा निवडणुकीद्वारे भरणे आवश्यक आहे. नगराध्यक्षपदाची निवड करण्यासाठीच्या विशेष सभेत अटी शर्तीच्या अधीन राहून मान्यता देण्यात आली आहे.

त्यामध्ये प्रामुख्याने विशेष सभा सुरू होण्यापूर्वी प्रत्येक सभासदाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहताना आपण आपल्या खोलीत एकटेच उपस्थित असल्याची खात्री पीठासीन अधिकारी यांना करून देण्यासाठी कॅमेरा 360 अंशात फिरून दाखवणे आवश्यक आहे, हे पीठासीन अधिकार्‍यांनी सुनिश्चित करावे.

तसेच स्वतःच्या खोलीत कोणालाही प्रवेश देऊ नये. कॅमेरा व सदस्यांमधील अंतर आठ फूट असणे आवश्यक आहे. सदरचे अंतर लाक्षणिक असून सदस्यांचे पूर्ण शरीर व आजूबाजूचा परिसर दिसणे आवश्यक आहे. वरील सर्व बाबींचे काटेकोरपणे पालन करूनच सभा करावी. सभेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत होत आहे याची खात्री पीठासीन अधिकार्‍यांनी करावी.

शिर्डी नगरपंचायत अध्यक्षपद दि. 14 जुलै 2015 अन्वये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित असल्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक लढवू इच्छिणार्‍यांनी आपले नामनिर्देशनपत्र नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात दि. 11 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत सादर करावेत.

उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रासोबत सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी त्याच दिवशी दुपारी अडीच वाजेपर्यंत करण्यात येणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 4 डिसेंबर दुपारी दोन वाजेपर्यंत आहे.

दरम्यान दि.7 डिसेंबर रोजी आवश्यकता असल्यास मतदान व मतांची नोंदणी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. शिर्डी नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी कार्यक्रम जाहीर झाल्याने आता घडामोडींना वेग येणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com