VIDEO: शिर्डी नगरपरिषदेची धडक कारवाई; अनधिकृत बांधकामांवर हातोडा

शिर्डी | शहर प्रतिनिधी

शिर्डी शहरातील वाढलेल्या अतिक्रमणावर शिर्डी नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने बुधवारी सकाळी अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारण्यात आला असून शहरातील....

हाँटेल इंटरनँशनल समोरील जागेत अतिक्रमण पथकाच्या कारवाईत साईनँशनल एम्पोरीयम आणी शेरे पंजाब रेस्टॉरंट हे दोन अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आले आहे. या कारवाईनंतर शहरातील अतिक्रमित धारकांनी धसका घेतला आहे. दरम्यान यापुढेही अशाचप्रकारे कारवाई सुरू ठेवणार असल्याची माहिती शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र शिर्डी शहरात कोव्हिड काळात आर्थिकदृष्ट्या खचून गेले होते.या दोन वर्षाच्या कालखंडानंतर शहरातील व्यवसायिक तसेच छोटे मोठे दुकानदार यांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक झळ सोसत पुन्हा नव्याने व्यवसाय सुरू करून वाटचाल करत असतांना शहरातील अनधिकृत अतिक्रमण धारकांवर शिर्डी नगरपंचायत प्रशासनाने अचानकपणे कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या हाँटेल इंटरनँशनल समोरील जागेवर साईनँशनल तसेच शेरे पंजाब हाँटेलवर बुलडोझरच्या सहाय्याने कारवाई करत सदरचे अतिक्रमण जमिनदोस्त करण्यात आले आहे. यापुढेही अशाचप्रकारे शहरातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा उगारणार असून यासाठी शिर्डी नगरपरिषद प्रशासनाने कंबर कसली आहे.

शहरातील श्रीमंतांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई होणार का? असा सवाल संतप्त झालेल्या अतिक्रमीत धारकांनी उपस्थित केला असून शिर्डी हि फकिराची नगरी आहे, पुर्वी रस्त्यावर होतो आता पुन्हा रस्त्यावर आलो आहोत. हि कारवाई फक्त गरीबांवरच होते असा आरोप करत नगर मनमाड महामार्गालगत असलेल्या श्रीमंत धनीकांच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा पडणार का अशी आर्त हाक त्यांनी अधिका-यांना मारली असल्याने यावर प्रशासन काय भुमिका घेते हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सदरची कारवाई करण्याच्या अनुषंगाने शिर्डी नगरपंचायतने बुधवार दि.११ रोजी सकाळी ११ वाजेपासून कारवाई केली आहे. सदरची अतिक्रमणे काढण्यासाठी प्रशासनाने २ जेसिबी, ४ ट्रॅक्टर, २० कर्मचारी, १ अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार संरक्षणासाठी १ पोलीस निरीक्षक तसेच क्यु आर.टी.जवान व पोलीस कर्मचारी यांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.

सदरचे अतिक्रमण काढण्यापूर्वी नगरपरिषद प्रशासनाने अतिक्रमण धारकांना नोटिसा पाठविल्या असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी सांगितले. दरम्यान या कारवाईमुळे धसका घेऊन अनेक जणांनी अतिक्रमण काढण्यास सुरवात केली आहे.

शहराच्या अनधिकृत बांधकाम संदर्भात कलम ५२,५३ नुसार अतिक्रमण धारकांना नोटीस बजावण्यात आली होती. ज्यांच्या नोटीसांची मुदत संपली त्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे. अतिक्रमण धारकांमध्ये गरीब श्रीमंत हा भेदभाव नसतो. त्यामुळे जो कोणी अनधिकृत बांधकाम करतो त्याच्यावरही कारवाई करण्यात येते. पहिल्या टप्प्यात हि कारवाई करण्यात आली असून पुढील कारवाईसाठी अधिक पोलीस बंदोबस्त मिळाल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

काकासाहेब डोईफोडे (मुख्याधिकारी शिर्डी नगरपरिषद)

Related Stories

No stories found.