शिर्डी नगरपंचायत निवडणुकीत दोन्ही अपक्ष अर्ज वैध

शिर्डी नगरपंचायत निवडणुकीत दोन्ही अपक्ष अर्ज वैध

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी नगरपंचायत निवडणुकीसाठी दाखल झालेले दोन्ही अपक्ष उमेदवारांचे उमेदवारी अर्ज छाननीमध्ये वैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली.

शिर्डी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 साठी निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर नगरपंचायत ऐवजी शिर्डी नगरपरिषद व्हावी यासाठी शिर्डीतील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व ग्रामस्थांनी निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकला होता. असे असतांना नगरपंचायत निवडणुकीसाठी असलेल्या 17 प्रभागापैकी फक्त 2 प्रभागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. उर्वरित 15 प्रभागांंकरिता एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता. दाखल झालेल्या 2 अपक्ष उमेदवारी अर्जामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी असलेल्या प्रभाग क्रमांक 11 साठी माजी नगरसेवक सुरेश आरणे यांनी तर सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये त्यांची पत्नी अनिताताई आरणे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी उमेदवारी अर्जाची छाननी केल्यानंतर दाखल झालेले दोन्ही उमेदवारी अर्ज वैध असल्याचे जाहीर केले आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत दि. 13 डिसेंबर 2021 पर्यंत असून त्यानंतर नगरपंचायत निवडणुकी संदर्भातचे अंतिम राजकीय चित्र स्पष्ट होईल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com