शिर्डी नगरपरिषद करणार 2 मेगावॅट वीज निर्मिती

शिर्डी नगरपरिषद करणार 2 मेगावॅट वीज निर्मिती

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी नगरपरिषदेद्वारे सौर उर्जेवर आधारित 2 मेगावॅट म्हणजेच 2000 किलोवॅट क्षमतेचा वीज निर्मिती प्रकल्प उभारणी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे यातील 600 किलोवॅट सौर उर्जा आधारित वीजनिर्मिती प्रकल्प प्रत्यक्ष उभारून त्यातून वीजनिर्मिती देखील सुरू झाली आहे.

नगरपरिषदेला अमृत योजनेंतर्गत 0.5 मेगावट क्षमतेचे 2 प्रकल्प मंजूर असून त्याअंतर्गत तयार होणारे एकूण वीज युनिट नेटमिटरिंगद्वारे महावितरणला जोडून तेवढेच युनिट महावितरणकडून नगरपरिषद वीज बिलातून वजा केले जात आहेत. याशिवाय मागील 5 वर्षापासून स्वच्छता व पर्यावरण संवर्धन अंतर्गत केलेल्या भरीव कामामुळे नगरपरिषदला केंद्र व राज्य शासनाकडून सलग पारितोषिक मिळत आहेत. या रकमेतून पुन्हा स्वच्छता व सौर उर्जा निर्मिती सारखी पर्यावरण संवर्धनाची कामे केली जात आहेत. अशा पारितोषिक रकमेतून 300 किलोवॅट क्षमतेचे प्रकल्प उभारण्यात येत असून 700 किलोवॅट क्षमतेचे वाढीव सौर उर्जा निर्मिती प्रकल्प देखील उभारणी करण्याचे नियोजन केले आहे.

सद्यस्थितीत नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्र, प्रशासकीय कार्यालय, फायर स्टेशन, वाचनालय तसेच चार मुख्य रस्त्यांवरील पथदिवे यासाठी सोलर वीजनिर्मिती सुरू झालेली असून मलनि:स्सारण केंद्र, खतनिर्मिती प्रकल्प, पंप हाऊस व इतर रस्त्यांवरील पथदिवे येथे सौरऊर्जा निर्मिती करण्याची कामे सुरू आहेत. याशिवाय नगरपरिषदेने शहरातील काही रस्त्यांवर 100 सौर पथदिवे देखील बसविले आहेत. वीज वापराच्या प्रमाणावर एवढ्या मोठ्या प्रमाणात सौर वीजनिर्मिती करणारी शिर्डी ही जिल्ह्यातील नव्हे तर बहुधा राज्यातील पहिली नगरपरिषद ठरणार आहे.

ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी नगरपरिषदेला सौर उर्जा निर्मिती कामाचा समावेश असलेल्या अमृत व इतर योजना मंजूर करून देण्यात विशेष भूमिका बजावल्याने शाश्वत, पर्यावरणपूरक, कमी खर्चिक, प्रदूषण विरहीत अशी सौर वीज निर्मिती करणे शिर्डी नगरपरिषदेला शक्य झाले आहे.

शिर्डी नगरपरिषदेस महिन्याला येणारे 25 लाख रुपये वीजबिल भरणे प्रचंड अडचणीचे ठरते. या पार्श्वभूमीवर सौर उर्जा निर्मितीचा उपाय हा एक प्रभावी तोडगा ठरणार आहे. उत्पन्न वाढविण्यावर मर्यादा असल्याने सुयोग्य नियोजन आणि कौशल्य वापरून खर्च कमी करणे हा देखील नगरपरिषदांचे उत्पन्न वाढवण्याचा एक उत्तम मार्ग ठरतो. सौर उर्जा निर्मितीचा उपक्रम हा इतर नगरपरिषदांना देखील दिशादर्शक ठरला आहे.

ना. विखे पाटील शिर्डी शहर विकासाला येणार्‍या सर्व अडचणी दूर करण्यासाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी सहकार्य उपलब्ध करून देत आहे. भविष्यात सर्व भागाचा समतोल विकास करण्यासाठी पायाभूत सुविधा उभारणी सोबतच विविध योजना राबवून व नवीन प्रकल्प उभारून रोजगार निर्मिती व सामाजिक-सांस्कृतिक विकास करणेसाठी देखील बारकाईने नियोजन केले जात आहे.

- माणिक आहेर, प्रशासक

शिर्डी नगरपरिषदकडून शहर विकासाच्या सर्व क्षेत्रात कामांचे नियोजन करून त्याची कालमर्यादेत व गुणवत्तेत प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. सौर उर्जा निर्मितीमुळे नगरपरिषद कार्बन क्रेडीटसाठी देखील अर्ज करणार आहे. ना. विखे यांच्या प्रयत्नातून यापुढे राबविले जाणारे काही प्रकल्प तर सर्व घटकांना मोठ्या संधी उपलब्ध करून देणारे आणि परिसराची अर्थव्यवस्था बदलून टाकणारे गेम चेंजर प्रकल्प ठरणार आहेत.

- सतीश दिघे, मुख्याधिकारी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com