शिर्डीत महाशिवरात्री निमित्त खिचडी प्रसाद घेण्यासाठी भाविकांची गर्दी

25 हजार 940 किलो साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद || 70 हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
शिर्डीत महाशिवरात्री निमित्त खिचडी प्रसाद घेण्यासाठी भाविकांची गर्दी

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

येथे महाशिवरात्री निमित्त साई दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यानिमित्त भाविकांना साबुदाणा खिचडी महाप्रसादाचा लाभ मिळावा यासाठी साई संस्थान प्रशासनाने यावर्षी 25 हजार 940 किलो उपवासाचे साहित्य वापरून भाविकांना खिचडी प्रसाद देण्याकरिता उत्कृष्ट नियोजन केले.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने साई संस्थान दरवर्षी शाबुदाना खिचडीचा महाप्रसाद साई प्रदालयात बनवत असते. शिर्डीत येणार्‍या सर्व भाविकांसाठी वर्षभर मोफत प्रसादाची सुविधा दिली जाते. मात्र खास करून महाशिवरात्रीच्या प्रसादाची आगळीवेगळी चव प्रसादाच्या माध्यमातून घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी बघावयास मिळाते.

शनिवारी महाशिवरात्री निमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी साईभक्तांनी शिर्डीत मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन यावर्षी महाशिवरात्री निमित्त साईसंस्थांने 5540 किलो शाबुदाना, 3810 किलो शेंगदाणे, 840 किलो वनस्पती तूप, 202 किलो हिरवी मिरची, 111 किलो मिरची पावडर इतक्या वस्तू या महाप्रसादासाठी वापर करून 25 हजार 940 किलो खिचडी प्रसाद बनविण्यात आला होता. आशिया खंडातील मेगाकीचन म्हणून ओळख असलेल्या साई प्रसादालयातील हा महाप्रसाद बनविण्यासाठी तीन शिफ्टमध्ये सरासरी 300 कर्मचार्‍यांनी मेहनत घेतली.

विशेष म्हणजे पंचक्रोशीतील अनेक भाविक तसेच ग्रामस्थांसाठी पाकिटे बनवून पाच रुपयात या प्रसादाची सुविधा निर्माण केली होती तर एकूण 25 हजार 940 पाकिटाचे वितरण करण्यात आले. दिवसभरात एकूण 70 हजार भाविकांनी या मोफत महाप्रसादाचा लाभ घेतला, अशी माहिती प्रसादालायाचे अधीक्षक विष्णू थोरात यांनी दिली.

विशेष म्हणजे अमरावती जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना प्रवासात विषबाधा झाल्याने ते दोन दिवसांपासून साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते अशा 200 विद्यार्थ्यांना दोन दिवसांपासून मोफत जेवणाची व्यवस्था साई संस्थानने केली आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने या सर्व विद्यार्थ्यांना खिचडीचा प्रसाद खाऊ घालून त्यांना परतीच्या प्रवासासाठी निरोप दिला.

शेंगदाण्याचे झिरके, रताळे व बटाटे यांच्यापासून बनविलेला शिरा, शाबुदाना खिचडी याचा समावेश असलेल्या महाप्रसादाचा लाभ घेतल्यानंतर अनेक भाविकांनी साई संस्थान प्रशासनाने केलेले उत्कृष्ट नियोजन व आयोजन याबद्दल समाधान व्यक्त केले. साई संस्थान भाविकांना महाशिरात्रीचा शाबुदाना खिचडीचा महाप्रसादाचे उत्कृष्ट नियोजन व घेतलेली मेहनत पाहून आम्ही धन्य झालो, अशी प्रतिक्रिया अभिषेक पाटील, पुणे या साईभक्तांने यावेळी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com