शिर्डी लोकसभेसाठी ना.आठवलेंची साखर पेरणी!

40 दिवसांत केल्या शिर्डी मतदारसंघाच्या चार वार्‍या
शिर्डी लोकसभेसाठी ना.आठवलेंची साखर पेरणी!

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

केंद्रीय सामाजिक व न्यायमंत्री रामदास आठवले यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघात आगामी सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीची साखर पेरणी सुरु केली आहे. गेल्या 40 दिवसांत त्यांच्या तब्बल चार वार्‍या या मतदारसंघात झाल्या आहेत. त्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील खासदारास दिल्लीत विशेष सन्मान दिला जातो. त्यामुळे या मतदारसंघाचा प्रतिनिधी होण्याची अनेकांची धडपड असते. सन 2009 साली हा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी-रिपाइं व मित्रपक्षांचे उमेदवार म्हणून रिपाइं नेते रामदास आठवले यांनी उमेदवारी केली होती. मात्र त्यावेळी शिवसेनेचे नवखे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांनी बाजी मारून श्री. आठवले यांचा पराभव केला होता. अ‍ॅट्रोसिटीच्या मुद्या उपस्थित करून झालेला विखारी प्रचार श्री. आठवले यांच्या पराभवास कारणीभूत ठरला.

त्यानंतर ना. आठवले यांनी या मतदारसंघाचा नाद सोडून दिला होता. मात्र दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. राजकारणाची समिकरणे बदलली. राज्यातील भाजप-शिवसेना युतीचा घटस्फोट झाला. रामदास आठवले यांच्या रिपाइं पक्षानेही काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडून केंद्रात मंत्रीपद पदरात पाडून घेतले. सन 2009 च्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये असलेले आ.राधाकृष्ण विखे पाटील भाजपवासी झाले. एवढेच नव्हे तर कमळाच्या चिन्हावर राधाकृष्ण विखे आमदार तर डॉ. सुजय विखे दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले.

भाजपा-शिवसेना युती असताना जागावाटपात शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेच्या वाट्याला होती. आता भाजप-सेना युती तुटल्याने भाजपाला या मतदारसंघात स्वंतत्र उमेदवार द्यावा लागणार आहे. त्यामुळे सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून ही जागा रामदास आठवले यांच्यासाठी सोडली जावू शकते, याचा विचार करून ना. रामदास आठवले यांनी आतापासूनच या मतदारसंघातील संपर्क वाढविला आहे.

दि. 27 फेब्रुवारी 2022 ते 11 एप्रिल 2022 या कालावधीत त्यांनी तब्बल चार वेळा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. 20 फेब्रुवारीला साईबाबांचा आशीर्वाद घेऊन त्यांनी या साखरपेरणीची सुरुवात केली. त्यानंतर 12 मार्च रोजी खा. डॉ. सुजय विखे व आ. राधाकृष्ण विखे यांनी राहाता येथे आयोजित केलेल्या केंद्र सरकारच्या वयोश्री योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना साहित्यवाटप कार्यक्रमास त्यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात ‘या मतदारसंघात मी कायम आले पाहिजे असे आ. विखे म्हणतात. पण मी नेहमी यायचे असेल तर तुम्हाला माझ्याकडे पहावे लागेल’ असे सूचक विधान ना. आठवले यांनी करून सन 2024 च्या शिर्डी लोकसभेसाठी आपण इच्छुक असल्याचे संकेत दिले. त्यानंतर पाच दिवसांनी माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांना श्रध्दांजली अर्पण करून कोल्हे कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी ना. आठवले कोपरगावला येवून गेले.

परवा दि.11 एप्रिल रोजी ना. आठवले पुन्हा श्रीरामपुरात आले. त्यांच्या सोबत आ. राधाकृष्ण विखे पाटील हेही होते. श्रीरामपुरातही त्यांनी स्व. शंकरराव कोल्हे यांची श्रध्दांजली सभा आयोजित केली होती. ना.आठवले यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा संपर्क वाढविल्याने आगामी निवडणुकीची ही साखर पेरणी मानली जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com