कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

जागरूक आमदारांमुळे राष्ट्रीय महामार्ग 160 या शिर्डी नगर रस्त्यासाठी चारशे तीस कोटी मंजूर झाले.

पण मग नगर मनमाड राष्ट्रीय महामार्ग शिर्डी कोपरगाव रस्त्याला आजपर्यंत ढबू देखील मिळाला नाही. याचा अर्थ येथील आजी माजी आमदारांसह खासदारही झोपलेले आहेत का? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते सुखदीप सिंग साहनी यांनी केला आहे .

दरवर्षी पावसाळ्यात नगर मनमाड 752 जी महामार्गावर हजारो खड्डे अवतरतात आणि हे त्यांचे अवतारकार्य दिवाळीपर्यंत सुरू राहते. खाच खळग्यांच्या मार्गातून वाट काढत कोपरगाववासियांचा प्रवास सुरूच राहतो. कोपरगाव शिर्डी या महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे.

त्यामुळे 14 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना दीड ते दोन तासांचा अवधी लागतो आहे. खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते आहे. दरवर्षी महामार्गाच्या दुरवस्थेचा प्रश्न चर्चेत येतो. गल्लीपासून दिल्लीपर्यंत या मार्गावरील खड्ड्यांची चर्चा होते. संबंधित यंत्रणांना रस्तेदुरुस्तीची डेडलाईन दिली जाते. प्रत्यक्षात कुठलीही कारवाई होत नाही.

मध्यंतरी नगर ते शिर्डी महामार्ग राष्ट्रीय महामार्ग 160 कामासाठी 430 कोटी मंजूर झाले आहेत. मात्र राष्ट्रीय महामार्ग 752 जी शिर्डी ते कोपरगाव या रस्त्यासाठी आमदार, खासदार यांच्याकडून निधी मंजूर करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याच्या कोणत्याही हालचाली व प्रयत्न दिसत नाही. असा आरोपही सहानी यांनी केला असून याबाबत येथील जनतेमध्ये मोठा रोष आहे.

कुंभकर्णी निद्रेत असलेल्या आजी माजी आमदार, खासदार, नगराध्यक्ष विविध पक्षाचे नेते व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे आधीच उद्ध्वस्त झालेल्या कोपरगावच्या बाजारपेठ व उद्योगावर आर्थिक संकटाची कुर्हाड कोसळणार असल्याची भीती सहानी यांनी व्यक्त केली आहे.

गुजरात मध्यप्रदेश यांना जोडणार्या महामार्गावरून सुट्टीच्या कालावधीत शिर्डीसाठी येणार्या भक्तांची संख्या जास्त असते. त्यामुळे महामार्गावरील जड वाहने, रिक्षा प्रवासी वाहतूक, ऊस वाहतूक यासह लहान वाहनांची संख्याही वाढते. रस्ता रुंदीकरणाची कामे जिथे झाली आहेत तिथेही रस्त्यांची अवस्था बिकट आहे.

दुर्दैवाने स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी याबाबत उदासीन आहेत. थातूरमातूर कामे केली जातात. थोड्याशा पावसात पुन्हा खड्डे तयार होतात. गेली सात वर्षे महामार्गाच्या कामाचे भिजत घोंगडे कायम आहे. यंत्रणा सुस्त आणि ठेकेदार मस्त अशी परीस्थिती कायम आहे.

कोपरगाववासीयांच्या नशिबी मात्र खडतर प्रवासाचा मार्ग कायम आहे. लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे आता कोपरगाव शिर्डी या रस्त्यासाठी शासन दरबारी जनतेनेच लढा उभारावा असे आवाहन सहानी यांनी केले आहे.