
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
लग्नासाठी आलेल्या शिर्डीतील एका हॉटेलमध्ये 2 लाख 50 हजारांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना घडल्याने वर्हाडी मंडळींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दागिने चोरी प्रकरणी शिर्डी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शिर्डी शहरातील नगर-मनमाड रोडवरील एका नामांकित हॉटेलमध्ये भाचीच्या लग्नासाठी आलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील संजय लालचंद सुराणा हे पत्नी अनिता सुराणा यांच्या बरोबर आले होते. 8 मे रोजी हळदीचा कार्यक्रम असल्याने एका खुर्चीजवळ पत्नीने हॅन्डबॅग ठेवली होती.
त्या बॅगेत 15 ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफुले किंमत 60 हजार, 10 ग्रॅम वजनाचा हार किंमत 40 हजार, 16 हजारांची अंगठी, 40 हजारांच्या बांगड्या, 66 हजार रोख, 9 हजारांचा मोबाईल, 4 हजारांचे घड्याळ असा जवळपास 2 लाख 50 हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद संजय लालचंद सुराणा यांनी शिर्डी पोलिसांत दाखल केल्याने शिर्डी पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात भादंवी कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
शिर्डी शहरात अनेक लग्न मोठमोठ्या नामांकित हॉटेलमध्ये होत असतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाडे देखील आकारले जाते. हॉटेल व मंगल कार्यालयाची सुरक्षा रक्षकांनी कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज असते.
अनेक हॉटेलमध्ये सीसीटीव्ही देखील आहेत. असे असतानाही अशा प्रकारच्या धाडसी चोरी शिर्डी शहरात होत असल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लग्नासाठी आलेल्या या कुटुंबातील व्यक्तींच्या आनंदावर या चोरीमुळे विरजन पडले असून या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.