शिर्डीतील आयटी अभियंता खून प्रकरण; माजी नगराध्यक्षाच्या पुत्रास अटक

शिर्डीतील आयटी अभियंता खून प्रकरण; माजी नगराध्यक्षाच्या पुत्रास अटक

पुणे |प्रतिनिधी| Pune

पुण्यातील सॉफ्टवेअर कंपनीत आयटी अभियंता असलेल्या मूळच्या शिर्डी येथील सौरभ नंदलाल पाटील (वय 23, रा. शिर्डी, ता. राहाता, जि. अहमदनगर) याच्या खूनप्रकरणी अटक केलेले आरोपी मयूर दळवी आणि कोपरगाव शहराचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांचा मुलगा निशांत झावरे यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांनी (दि. 23 ऑगस्टपर्यंत) वाढ करण्याचे आदेश खेड न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी दिले.

सौरभ हा पुण्यातील हिंजवडी फेज एक येथील एका आयटी कंपनीत नोकरी करीत होता. 28 जुलै रोजी तो दुचाकीवरून कंपनीत कामासाठी गेला होता. मात्र त्यानंतर तो माघारी परतलाच नाही. दरम्यान, त्याच्या कुटुंबियांनी सर्वत्र शोधाशोध केली. मात्र त्याचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. यानंतर त्याच्या कुटुंबियांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. यानंतर 5 ऑगस्ट रोजी खेड तालुक्यातील सांडभोरवाडी येथे वन विभागाच्या जागेत पुणे-नाशिक महामार्गालगत डोंगर उताराला सौरभ याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. कोपरगाव येथील संजिवनी महाविद्यालयात शिक्षण घेत असताना खुन्नसने पाहिल्याच्या कारणावरून आरोपी मयूर दळवी आणि मृत सौरभ पाटील या दोघांचे भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मयुरच्या मनात होता. त्यावरून मयूर याने सौरभ याची आधी चाकूने वार करून आणि दगडाने ठेचून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

तपासादरम्यान, या खुनाचे धागे कोपरगावपर्यंत असल्याचे पोलिसांना कळले. त्यातून या खुनाचा मास्टर माईंड मयूर दळवी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी मयूर दळवीला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. तसेच या प्रकरणात निशांत झावरे याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यालाही पोलिसांनी अटक होती. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली होती. सोमवारी त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना खेड न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने त्यांच्या पोलिस कोठडीत 23 ऑगस्ट पर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले.

सुनावणी दरम्यान, आरोपीने खून करताना जो मोबाइल वापरला होता तो कोपरगाव येथे फेकून दिला आहे व त्याचे सीम कार्ड दुसर्‍या मोबाईलमध्ये टाकले आहे. तसेच खून केल्यानंतर मयत सौरभचा मोबाईल नदीमध्ये फेकून दिला आहे. हे दोन्ही मोबाईल जप्त करायचे आहे आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास करायचा असल्याने आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती खेड पोलिसांनी न्यायालयाने केली. त्यानुसार न्यायालयाने आरोपींच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांनी वाढ केली.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com