शिर्डीत हायअलर्ट

शिर्डीत हायअलर्ट

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

पंजाब येथील संशयित दहशतवाद्यास शिर्डीतून जेरबंद केल्यानंतर देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या श्री साईमंदिराची सुरक्षा यंत्रणा हाय अलर्ट करण्यात आली असून जगभरातून श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येणार्‍या प्रत्येक साईभक्ताची सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली असल्याची माहिती साईबाबा संस्थानच्या साईमंदिर सुरक्षा यंत्रणेचे पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब परदेशी यांनी दिली.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पंजाब येथील एका घटनेतील दहशतवाद्यास शिर्डीतून एका हॉटेलमधून अटक करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या गाडीला IED लावूुन जीवे मारण्याच्या कटात सदर दहशतवादी सामिल होता. राजेंंद्र कुमार असं या दहशतवाद्याचं नाव समोर आलं होतं. राजेंद्र साई दर्शनासाठी जाणार होता अशी माहिती देखील शिर्डीचे विभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली होती. त्यातच शिर्डी साई मंदिर अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असल्याचे केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने अगोदरच सांगितले आहे.

त्या अनुषंगाने श्री साईबाबा संस्थानने आपली सुरक्षा यंत्रणा अलर्ट केली असून पोलीस प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे. अमृतसर येथील एका पोलीस उपनिरीक्षकाच्या गाडीला स्फोटके लावून उडवून देण्याचा प्रयत्न करणार्‍या संशयीत गुन्हेगारास शिर्डी शहरातील एका हॉटेलमध्ये पंजाब एटीएस, नाशिक एटीएस व शिर्डी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत शुक्रवार 20 आँगस्ट रोजी अटक करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने शिर्डी शहरातील सर्व हॉटेल मालक व चालक यांना शिर्डी पोलीसांकडून सुचना करण्यात आल्या आहे.

तर सर्वधर्मसमभावाचे प्रतिक असलेल्या शिर्डी येथील जगप्रसिद्ध श्री साईमंदिराची सुरक्षा यंत्रणा पहिल्यापासून सतर्क होती.त्यामुळे साईभक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिक सतर्क करण्यात आली असून काळजी घेण्यात येत असल्याचे साईमंदीर सुरक्षा अधिकारी अण्णासाहेब परदेशी यांनी सांगितले.श्री साईमंदीरात तसेच मंदिर परिसरात ठिकठिकाणी सिसिटीव्ही कॅमेरे तसेच पाचही प्रवेशद्वारावर बँग स्कॅनर, क्युआरटी जवान, पोलीसांचा मोठा फौजफाटा यांसह अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित आहे.

शहरात देखील काही ठिकाणी सिसिटीव्ही यंत्रणा बसविण्यात आल्या असल्या तरी देखील केंद्रशासनाच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पूर्ण शिर्डी शहरात सिसिटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार होते. मात्र सदरच्या योजनेला अद्यापही मुहुर्त सापडत नसल्याने साईभक्तांच्या सुरक्षेसाठी श्री साईसंस्थान प्रशासनाच्या वतीने शहरात सिसिटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत अशी मागणी साईभक्त तसेच ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com