आता तरी थांब! शिर्डीकरांचे वरूणराजाला साकडे

शिर्डीत अतिवृष्टीमुळे पाणीच पाणी चोहीकडे
आता तरी थांब! शिर्डीकरांचे वरूणराजाला साकडे

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

सतत पडणार्‍या मुसळधार पावसाने नद्या, ओढे नाले ओसंडून वाहत आहेत. मात्र याच पावसाच्या पाण्याने शिर्डी शहराला चोहोबाजूने वेढले असून अनेक उपनगरांत पाणी साचल्याने ठिकठिकाणी जलमय परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. शिर्डीत अनेक उपनगरांत नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान होऊन संसारोपयोगी वस्तू, अन्नधान्य, कपडे पाण्यात वाहून गेले आहेत. तर पाण्याचा निचरा होत नसल्याने साठलेल्या पाण्यात जंतू, डास यांची मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

लक्ष्मीनगर, सीतानागर, वाघवस्ती, हेडगेवार नगर, साईनाथ हॉस्पिटल, प्रसादालय, पेट्रोलपंप, शासकीय विश्रामगृह, दोनशे रूम गार्डन, बिरोबाबन, कनकुरी रोड, स्मशानभूमी अशा महत्त्वाच्या ठिकाणी पाण्याने वेढा दिला असून सतत पडणार्‍या मुसळधार पावसामुळे दिवसेंदिवस शिर्डीचे जनजीवन धोक्यात सापडले आहे. त्यामुळे आता तरी थांब, असे साकडे शिर्डीकर वरूणराजाला घालताना दिसत आहेत.

शिर्डीत जिकडे तिकडे चोहीकडे पाणीच पाणी दिसत असून साठलेले पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने शिर्डी नगरपरिषद आपत्कालीन प्रशासनाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. अनेक उपनगरात साठलेले पाणी पंपाद्वारे वाहनावरील मोटारीच्या सहाय्याने भूमिगत असणार्‍या गटारीच्या पाईपलाईनच्या चेंबरमध्ये सोडले जात आहे. मात्र, ते चेंबरही ओव्हरफ्लो झाल्याने साठलेल्या पाण्याची विल्हेवाट कशी करावी? हाच मोठा गंभीर प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. शिर्डीत अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंबातील लहान मुले, वयोवृद्ध नागरिक या साठलेल्या पाण्याच्या दुर्गंधीमुळे आजारी पडत असून त्यांच्या उपचारासाठी साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा मोठा आधार आहे.

मात्र, तेही हाऊसफुल्ल झाले आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी शिर्डीत अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करून नुकसान झालेल्या घरांची, दुकानाची तसेच शेतीमालाचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. याबरोबरच ओढ्यावरील असलेल्या अतिक्रमणामुळे शिर्डीत जलमय परिस्थिती निर्माण झाली. त्यावरील झालेले अतिक्रमण काढण्याच्या सूचना ना.विखे यांनी दिल्या. तसेच शिर्डीतील नागरिकांची गैरसोय होऊ नये, याकरिता उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्याने शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे तसेच मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी आपत्कालीन परिस्थितीचा अंदाज घेऊन अनेक यंत्र सामुग्री ठिकठिकाणी कार्यान्वित केली.

तरी पाण्याचा निचरा होत नसल्याने तेही हतबल झाले आहेत. अनेक उपनगरातील नागरिक वेगवेगळ्या समस्या घेऊन येत आहेत. मात्र त्यावर तोडगा काढण्यास प्रशासनही कमी पडत आहे. अनेक शालेय विद्यार्थी भिजलेल्या शालेय पोषाखात शाळेत जातात. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सायकलद्वारे प्रवास करणार्‍या अनेक विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एकंदरितच शिर्डीत सतत पडणार्‍या मुसळधार पावसामुळे सर्व जनजीवन विस्कळीत होऊन मोठे संकट ओढवले आहे. याची गंभीर दखल घेऊन महसूलमंत्री विखे यांनी विविध विभागाच्या अधिकार्‍यांसोबत मंगळवारी अनेक ठिकाणी पाहणी करून बाधित झालेल्या सर्व कुटुंबियांना आधार देत सर्वोतोपरी तात्काळ मदत करण्याचा विश्वास दिला आहे. पाऊस असाच जर सुरू राहिला तर भविष्यात अनेक शिर्डीवासियांना स्थलांतराशिवाय दुसरा कोणताच पर्याय राहणार नाही. मात्र निसर्गाच्या कोपापुढे सर्वचजण हतबल झाले असून आता तरी थांब, असे शिर्डीकरांनी वरूणदेवतेला साकडे घालण्यास सुरुवात केली आहे.

ना. राधाकृष्ण विखे पाटील व खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्यामुळे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी पावसाचे पाणी साचलेल्या ठिकाणी कर्मचार्‍यांची टीम करून पाणी उपसा करण्याकरिता वेगाने मोहीम हाती घेतल्यामुळे शहरातील साचलेले पावसाचे पाणी कमी होण्यास मोठी मदत होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com