शिर्डीत 2 लाख 39 हजाराच्या गुटख्यासह गावठी कट्टा जप्त

शिर्डीत 2 लाख 39 हजाराच्या गुटख्यासह गावठी कट्टा जप्त

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी शहरात अवैध गुटख्याची चोरून विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून शिर्डी पोलिसांनी टाकलेल्या धाडीत सुमारे 2 लाख 39 हजार 580 रुपयांच्या मुद्देमालासह एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन आरोपींना अटक केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी दिली.

नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या आदेशानुसार जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांना शहरातील एका गोडाऊनमध्ये गुटख्याचा अवैध साठा असल्याची माहिती खबर्‍याकडून मिळाली. तसेच त्या गुटख्याबरोबरच मध्यप्रदेशातून हत्यारे पाठवली जातात आणि त्याची विक्री केली जाते, अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, सहायक पोलीस निरीक्षक दातरे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी धडक दिली. पथकाला खोलीच्या झडतीत ठिकाणी गुटखा, सुगंधी तंबाखू, पानमसाला मिळून आले.

याठिकाणी राहाणार्‍या आयुष सुनील कशीष (वय 19) रा.राजमोहला कॉलनी, इंदोर मध्यप्रदेश यास ताब्यात घेऊन अधिक झडती घेतली असता त्याच्या खोलीतून देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतुस मिळून आले आहे. पोलिसांनी हस्तगत केलेल्या मालात विविध कंपन्यांचे गुटखा व पानमसाल्यासह विना नंबरची पांढर्‍या रंगाची दुचाकी आणि देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुस असा एकूण 2 लाख 39 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी गु.र. नं.204/2022 प्रमाणे आयुष सुनिल कशीष, आशिष अशोकलाल खाबिया, (रा.साईसावली निवास, गोवर्धन नगर, शिर्डी), अभय रामेश्वर गुप्ता (रा.इंदोर) यांच्याविरोधात भादंवि कलम 188,272,273,328 सह अन्न सुरक्षा मानदे कायदा 2006 आणि त्याखाली नियम 2011 चे कलम 26 (2) (4) सह भारतीय हत्यार कायदा 3 (25) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अभय गुप्ता हा पसार झाला असून दोघांना अटक करण्यात आली. पुढील तपास सहा पोलीस निरिक्षक दातरे करत आहे.

सध्या विभागात अवैध धंद्याविरोधात कडक कारवाई सुरू आहे. शिर्डी शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत माहिती देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे. निश्चित कारवाई केली जाईल.

- संजय सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी

Related Stories

No stories found.