शिर्डीत पाईपलाईनद्वारे गॅस

शिर्डीत पाईपलाईनद्वारे गॅस

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

देशात घरगुती गॅस सिलेंडरचे दर गगनाला भिडले आहेत, असे असताना मात्र आजच्या दरानुसार 35 रुपये किलोप्रमाणे भारत गँस कंपनीच्या माध्यमातून घरोघरी नॅचरल गॅस पाईपलाईनद्वारे कनेक्शन देण्यात आले असून गॅसच्या वाढत्या किंमतीपासून सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळणार आहे. शिर्डी शहरात या गॅस कनेक्शनसाठी मोठ्या प्रमाणावर मागणी होत असून आतापर्यंत शहरात 600 पेक्षा जास्त ग्राहकांना कनेक्शन देण्यात आले असल्याची माहिती शिर्डी शहरातील कंत्राटदार महेश मगर यांनी दिली आहे.

देशात महागाईमुळे इंधनाचे दर गगनाला भिडले असून गॅस सिलेंडरचे दर प्रचंड वाढल्याने सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. आज 14.2 किलो वजनाच्या गॅस टाकीसाठी 1 हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे नागरिक हैराण झाले असून बजेट कोलमडले आहे. गॅस सिलेंडरचे वाढते दर न परवडणारे आहे. त्या तुलनेत भारत गॅसच्या नॅचरल गॅसचे दर पन्नास टक्केच आहे. म्हणजेच पाईपलाईनद्वारे पुरविण्यात येणारा 14 किलो वजनाचा नॅचरल गॅस आजच्या दराने 490 रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे गृहिणींची प्रत्येक महिन्याला चक्क 510 रुपयांची बचत होणार आहे.

भारत गॅस कंपनीच्या माध्यमातून नगर ते मनमाड महामार्गावरील पाईपलाईनचे खोदकाम सुरू आहे. यासंदर्भात खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी बिपीसीएलच्या अधिकार्‍यांसमवेत आढावा बैठक घेतली आहे. भारत गॅस कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यात घरोघरी पाईपलाईनद्वारे नॅचरल गॅस सेवा पुरविण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र शिर्डी शहरातील विविध उपनगरात आतापर्यंत सुमारे 600 घरांना गॅस कनेक्शन पाईपलाईनद्वारे देण्यात आले आहे.

या कनेक्शनला मिटर देखील जोडले जाणार आहे. त्यामुळे गॅसचा जेवढा वापर केला जाईल तेवढेच पैसे भरायचे आहे. या नॅचरल गॅससाठी मिटर सिस्टीम असल्यामुळे वायफळरित्या वाया जाणारा गॅसचा आता काटकसरीने वापर केला जाईल. सदरचे कनेक्शन घेण्यासाठी ग्राहकांना लाईटबिल, रेशनकार्ड, आधारकार्ड इ. कागदपत्रांची आवश्यकता आहे.तसेच गॅस पुरवठा चालू करण्यासाठी पार्ट पेमेंटमध्ये डिपॉझिट घेण्यात येणार असल्याचे श्री. मगर यांनी सांगितले. एकंदरीतच नॅचरल गॅसमुळे गृहिणींना दिलासा मिळणार आहे.

भारत गॅस कंपनीच्या माध्यमातून शिर्डी शहरातील घरांना देण्यात आलेल्या नॅचरल गॅस पाईपलाईनसाठी फायर सेफ्टीसाठी आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे अर्ज अथवा परवानगी घेतलेली नाही.आम्ही याविषयी पुर्णपणे अनभिज्ञ आहोत.

- संभाजी कार्ले, फायर अधिकारी, शिर्डी नगरपरीषद

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com