शिर्डी (प्रतिनिधी) -

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्यावतीने कोव्हीड-19 चे संदर्भीत सर्व नियमांचे व मार्गदर्शक नियमांचे पालन

करून लाडू प्रसाद उत्पादन पुनश्च प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेले असुन श्रींचे दर्शनासाठी येणार्या भाविकांना दर्शन झाल्यानंतर दर्शन रांगेत अंदाजे 50 ग्रॅम वजनाचा 1 बुंदी लाडू प्रसाद रूपाने विनामुल्य वाटप करण्यास सुरूवात करण्यात आलेली आहे.

श्री साईबाबा संस्थानच्या मार्फत सन 1990 पासुन श्री क्षेत्र शिर्डी येथे येणारे साईभक्तांना तिरुपती देवस्थानाच्या धर्तीवर साजुक तुपातील व खिसमीस, काजू, बदाम, विलायची आदिंचा समावेश करुन बुंदीच्या लाडूची प्रसाद स्वरुपात विक्री केली जाते. तसेच 15 ऑगस्ट 2013 पासुन श्रींचे दर्शनासाठी येणार्या साईभक्तांना दर्शन रांगेमध्ये 50 ग्रॅम वजनाचे सुटी बुंदी प्रसाद पाकीट प्रसाद रूपाने मोफत वितरीत करण्यात येत होते. जगभरात, देश व राज्यात आलेल्या करोना व्हायरसच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाच्यावतीने लॉकडाऊन करुन दिनांक 17 मार्च 2020 पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद करण्यात आलेले होते. त्यामुळे सशुल्क लाडू प्रसाद पाकीट विक्री व दर्शन रांगेतील विनामुल्य बुंदी प्रसाद पाकीट वितरण पुर्णत: बंद करण्यात आले होते.

दिनांक 14 नोव्हेंबर 2020 रोजी राज्य शासनाच्या आदेशान्वये दिनांक 16 नोव्हेंबर पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्यात आलेले आहे. तसेच कोव्हीड-19 चे संदर्भीत सर्व नियमांचे व मार्गदर्शक नियमांचे पालन करून लाडू प्रसाद उत्पादन पुन:श्च प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेले आहे. त्यानुसार शनिवार दि. 6 मार्च 2021 रोजी पासुन श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी येणार्या भक्तांना दर्शन झालेनंतर दर्शन रांगेत सुटी बुंदी प्रसाद पाकीटाऐवजी अंदाजे 50 ग्रॅम वजनाचा 1 बुंदी लाडू प्रसाद रूपाने पाकिटातुन विनामुल्य वितरीत करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. सदरचा लाडू अत्यंत शास्त्रोक्त पध्दतीने करण्यात येत असून त्याचा वापर भक्तांनी प्रसाद म्हणुन त्वरीत सेवन करावा. त्याचा वापर 24 तासाचे आत करण्यात यावा.

सध्या दर्शनरांगेमध्ये वितरीत करणेत येणारा बुंदी लाडू प्रसाद हा सुधारीत पद्धतीने तयार करण्यात आलेला असुन भक्तांना त्याची प्रदीर्घ काळापासून प्रतिक्षा व मागणी देखील होती.