शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी शहरात मोलमजुरी तसेच छोटामोठा व्यवसाय करुन कुटुंब चालविणार्यांंपैकी रहिवासी भाग म्हणून लक्ष्मीनगरची ओळख नावारूपाला आली

असून या ठिकाणचे सर्व नागरिक लाकडाऊनच्या काळात व्यवसाय तसेच धंदापाणी नसल्याने आर्थिक कोंडीत सापडले आहे. विज महावितरण कंपनीने कोणतीही सुचना न देता आम्हा गरीबांचे विज कनेक्शन तोडले असल्याने येथील रहिवाशांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मागणी देखील केली होती. त्यामुळे विज महावितरण कंपनीचा निषेध करत शिर्डी येथील प्रांत कार्यालयासमोर प्रांगणात आमरण उपोषण सुरू केले आहे.

लक्ष्मीनगर भागातील रहिवाशांचे विज कनेक्शन जोडून देण्यासाठी लक्ष्मीनगर येथील रहिवासी असलेले सुनील आरणे यांच्यासह विस जणांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा तहसीलदार यांना दिला होता. येथील रहिवासी मोठ्या प्रमाणावर मजुरी व्यवसाय करत असून गरीबीत आपले जीवन जगत आहे.

घरगुती वीज कनेक्शन असून काही दिवसांपासून लॉकडाऊन व इतर कारणांमुळे शिर्डी परिसरामध्ये साईभक्तांची संख्या कमी झाल्याने रोजगार कमी झाला आहे. शिर्डी शहरात अजूनही साईदर्शनाकरिता शासनाचे निर्बंध असल्याने रोजगार नाही. यावेळी येथील रहिवाशांनी सांगितले की महावितरण कर्मचार्यांनी आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता आमचे घरगुती वीज कनेक्शन तोडले आहे, तसेच आम्ही त्यांना लेखी विनंती केली की पुढील चार ते पाच महिन्यात हप्त्या हप्त्याने विजबिल पूर्णपणे भरतो.

परंतु त्यांनी आमचे काहीएक म्हणणे ऐकून घेतले नाही. आमचे कनेक्शन तरी जोडण्यात यावे तसेच आम्ही पुढील काही दिवसांमध्ये आम्हाला तीन चार टप्प्यांमध्ये वीज बिल भरण्यास सवलत द्यावी अशी मागणी तहसीलदार यांना केली होती,

मात्र आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने आम्ही दि. 18 रोजी सकाळी 11 वाजेपासून उपविभागीय अधिकारी शिर्डी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेलो असल्याचे सुनील आरणे यांनी सांगितले. यावेळी शिर्डी नगरपंचायतचे मा.उपनगराध्यक्ष तथा लक्ष्मीनगरचे नगरसेवक मंगेश त्रिभुवन यांनी देखील उपोषणास बसलेल्या रहिवाशांना पाठिंबा दर्शवला.