
शिर्डी | Shirdi
एकीकडे साईबाबांच्या झोळीत कोट्यवधी रुपयांच्या देणगीची वाढ झाली तर दुसरीकडे स्थानिक व्यावसायिकांच्या अर्थकारणाचा गाडा अजूनही फसलेलाच आहे. याचे कारण म्हणजे शिर्डी गावाला शहराचा दर्जा प्राप्त झाला असला तरी शहरातील बाजारपेठा व परिसर विकसित होण्यासाठी ठोस विकास आराखड्याची गरज असून भाविकांच्या मनोरंजनासाठी याठिकाणी वेगवेगळे प्रकल्प उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. तरच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊन येथील अर्थकारणाला गती मिळू शकेल याकरिता तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे.
शिर्डी व राहाता शहरात मोठ्या प्रमाणात बाजारपेठ विकसित न झाल्यामुळे अनेक नागरिक खरेदीसाठी श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर, नाशिक, नगर व अन्य शहरांना पसंती दर्शवितात. त्याचे कारण म्हणजे कोणतीही वस्तू खरेदी करताना कंपनी, ब्रँड, गुणवत्ता, व्हरायटीज, शोरूम, वाहन पार्किंग व्यवस्था ग्राहकांच्यादृष्टीने महत्त्वाच्या बाबी आहेत. शिर्डीत कपडे, बूट , क्रॉकरी, सौंदर्य प्रसाधने, सोने, चांदीची, किराणा दुकाने आहेत. मात्र ही सर्व दालने एकाच छता खाली नसल्यामुळे शिर्डीत येणार्या भाविकांना वेगवेगळे साहित्य खरेदी करण्याकरिता गर्दी अभावी शक्य होत नाही.
तसेच वाहन पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत असल्यामुळे भाविक तसेच शिर्डीत येणार्या नागरिकांना हिच सेवा शोरूमच्या माध्यमातून निर्माण झाली तर शिर्डीची बाजारपेठेची एक नवी ओळख निर्माण होऊ शकते. कोणतीही बाजारपेठ ही ग्राहकांच्या विश्वासावरच अवलंबून असते. सध्याच्या युगात दररोज नवनवीन साहित्य अर्थात कपडे, मोबाईल, किचन साहित्य, घरात लागणार्या महत्वाच्या इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तू, मुलांचे शालेय साहित्य यासर्व गोष्टी खरेदी करण्याचा कल जास्त असतो. साहजिकच केवळ ब्रँडेड वस्तू, भव्य दालने आणि शहराप्रमाणे कापड मार्केट, सोन्या चांदीचे मार्केट, शु पॅलेस, क्रॉकरी, सौंदर्य प्रसाधने, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तू किराणा माल यांची भव्य दिव्य शोरूम्स ग्राहकांना आकर्षित करतेच परंतु आपल्या मनासारख्या वस्तू खरेदी करण्याचे समाधानही त्यांना या माध्यमातून मिळते.
सध्याच्या आधुनिक युगात प्रत्येकाचे जीवन धावपळीचे झाले आहे. विविध वस्तू खरेदी करिता नागरिकांना वेळेची मर्यादा निर्माण झाली आहे. परिणामी ग्रामीण भागापासून तर शहरी भागांमध्ये राहणार्या नागरिकांनी वस्तू खरेदी करण्याकरिता ऑनलाईनला पसंती दिल्यामुळे जवळपास बहुतांशी छोट्या-मोठ्या दुकानदारांना या ऑनलाईन खरेदीचा आर्थिक फटका बसत आहे. एकंदरितच शिर्डीच्या आजवरच्या इतिहासात नॉव्हेल्टी, हार प्रसाद, लॉजिग, रेस्टॉरंट, फास्टफूड याव्यतिरिक्त कोणत्याही व्यवसायाला पसंती न दिल्याने शिर्डीत भक्कम अशी विश्वसनीय बाजारपेठ आजपावेतो उभी राहू शकली नाही हे एक दुर्दैव म्हणावे लागेल.
हळूहळू शिर्डीतील तरुण आता नवीन संकल्पनेच्या आधारावर अनेक नवनवीन प्रोजेक्ट मार्केटमध्ये उतरवत असले तरी दुकानाचे न परवडणारे भाडे, पार्किंगची असुविधा, यामुळे शिर्डीत येणार्या भाविकांचा खरेदीकडे ओघ कमी होत असल्यामुळे शिर्डीतील मोठ्या बाजारपेठेचे स्वप्न आजही अधुरेच राहिले आहे. साईबाबा संस्थान हे देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान म्हणून समजले जाते. बाबांच्या समाधीचे दर्शन घेण्याकरिता देश-विदेशातून भाविक शिर्डीत येतात.
दर्शन घेतल्यानंतर नागरिकांना मनोरंजनासाठी शिर्डी परिसरात कुठलीही सुविधा नसल्यामुळे शिर्डीत येणारा भाविक दर्शन घेऊन लगेचच परतीचा प्रवासाकडे निघतो. परिणामी येथील व्यावसायिकांना शिर्डीत येणार्या भाविकांचा कुठलाही व्यवसाय दृष्टिकोनातून आर्थिक मदत होत नसल्यामुळे या परिसरातील व्यावसायिकांच्या अर्थचक्राला गती मिळत नाही. त्यामुळे येथील व्यावसायिकांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे दिवसेंदिवस वाढत आहे. साईबाबा संस्थाने या परिसरात भाविकांच्या मनोरंजनासाठी वेगवेगळे प्रकल्प उभारले तरच येथील अर्थकारणाला गती येऊन शिर्डीच्या अर्थकारणाला चालना मिळू शकेल.
शिर्डीत साईसमाधी मंदिराव्यतिरिक्त भाविकांना मनोरंजनाचे, पर्यटनाचे साधन नसल्याने भाविक सहसा मुक्कामी थांबत नाही तर समृद्धी महामार्ग सुरू झाल्यावर ही परिस्थिती अजून चिंताजनक होईल की काय? असा प्रश्न येथील व्यावसायिकांना वाटू लागला आहे. साईबाबा संस्थाने येथील अर्थकारणांना चालना देण्याकरिता भाविकांच्या मनोरंजनासाठी मोठे प्रकल्प उभारणे गरजेचे आहे.
- संदीप सोनवणे, उद्योजक शिर्डी