शिर्डीचा विकास अडला कुठे?

शिर्डीचा विकास अडला कुठे?

शिर्डी | Shirdi

महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत असलेले साईबाबा संस्थान सध्या कायद्याच्या कचाट्यात सापडले आहे. न्यायालयाने घालून दिलेले नियम आणि त्याचे पालन करणे अनिवार्य असल्याने तदर्थ समितीला कायद्याच्या चौकटीतच कामकाज अथवा निर्णय घ्यावे लागतात. राहाता पंचक्रोशीतील विकासाची कामधेनू म्हणून साई संस्थानकडे बघितले जाते. कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी शिर्डीतील साई संस्थानबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यास राज्य सरकार कायमच उदासीन असल्याचा अनुभव ग्रामस्थांना येत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

वास्तविक साईबाबांच्या आशीर्वादाने शिर्डी तीर्थक्षेत्र हे आंतराष्ट्रीय झाले असले तरी या शहराचा विकास मात्र जसा व्हायला हवा तसा झालेला नाही. त्याचे मुख्य कारण विश्वस्त मंडळाची अस्थिरता. परिणामी साई संस्थानचा कारभार कासवाच्यागतीने सुरू आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

बसस्थानक, रेल्वेस्टेशन, हॉस्पिटल, शैक्षणिक संकुल, आशिया खंडातील सर्वात मोठे मेगा किचन साई प्रसादालय व आंतरराष्ट्रीय विमानतळ ही सर्व विकास कामे दहा वर्षांपूर्वीच्या विश्वस्तांच्या धोरणात्मक निर्णयाचे प्रतीक आहे. मात्र त्यानंतर या दहा वर्षांत केवळ अस्थिरतेमुळे शिर्डीतील विकास पूर्णपणे ठप्प झाला आहे. याची कारणे वेगवेगळी असू शकतात. मात्र भारतातील अनेक उद्योगपतींची नजर शिर्डी काकडी आंतरराष्ट्रीय विमानतळ या परिसराकडे लागले आहे. काही दिवसांतच नाईट लँडिंग सुविधेसह कार्गो विमानसेवा सुरू होणार आहे.

या एअरपोर्टची सध्या साडे सातशेहून अधिक एकर परिसरामध्ये असल्याने विमान पार्किंगसाठी मोठी जागा उपलब्ध आहे. अशातच पुणे, मुंबई, औरंगाबाद तसेच इतर जिल्ह्यातील अनेक छोट्या मोठ्या कंपन्यांचे प्रॉडक्ट, शेतकर्‍यांचे द्राक्ष, पेरू, डाळिंब, इतर भाजीपाला याचे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी शिर्डी आंतरराष्ट्रीय एअरपोर्टची कार्गो विमानसेवा हे राज्याचे भविष्यात केंद्र होऊ शकते. त्यामुळेच सध्या काकडी शिवारात अनेक उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात गोडाऊनसाठी जागा विकत घेण्यासाठी शोधाशोध सुरू केली आहे. त्यामुळे भविष्यात शेतकर्‍यांना सुगीचे दिवस तर येतीलच पण या माध्यमातून अनेक तरुण तरुणींना मोठ्या रोजगाराची आणि नोकरीची संधी या माध्यमातून निर्माण होणार आहे.

साई संस्थानने पुढाकार घेऊन आयटी पार्क, मेडिकल कॉलेज, पर्यटनासाठी मनोरंजक बगीचा, लेजर शो यासारखे रखडलेले प्रोजेक्ट लवकर विकसीत केले तर साईंची शिर्डी एक आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्राबरोबर एअरपोर्टच्या माध्यमातून एक ट्रान्सपोर्ट बिझनेस हब सेंटर म्हणून लवकरच नावारूपाला येऊ शकते, असा अनेक उद्योजक आणि व्यापार्‍यांना विश्वास आहे. यासाठी एक पाऊल पुढे म्हणून साई संस्थान प्रशासनाने अभ्यासपूर्वक विचार करून यावर निर्णय घेतले तर बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल व शिर्डी शहर हे हायटेक सिटी म्हणून लवकरच ओळखले जाईल.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून काकडी येथे विमानसेवेची नाईट लँडिंग सुरू होणार असल्याने या परिसरातील शेतकर्‍यांचा शेतीमाल परदेशात विक्रीसाठी कार्गो विमानसेवेतून नेण्यास सोपे होणार आहे. त्यामुळे शिर्डी हे राज्यातील हायटेक शहर म्हणून लवकरच नावारूपास येईल.

- विजय कोते, संस्थापक साईनिर्माण उद्योग समूह

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com