
शिर्डी | Shirdi
शहरात गंठणचोरी, रोडरोमिओंचा सुळसुळाट, पाकिटमारी, अवैध दारूविक्री, मटका, जुगार तसेच वाढती गुन्हेगारी नागरिकांसाठी मोठी चिंतेची बाब ठरत असून शिर्डी पोलिसांनी वेळीच आपल्या खाकीचा धाक निर्माण करून वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
शिर्डीमध्ये देश विदेशातून येणार्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे अनेक पाकिटमार टोळ्या, महिलांचे मंगळसूत्र तसेच सोनसाखळी चोरीचे वाढते प्रमाण, दुचाकी वाहनांची चोरी हे शिर्डी पोलिसांना मोठी डोकेदुखी ठरत आहे. अनेक उपनगरात हॉटेल, लॉजिंगचे प्रमाण जास्त आहे. अनेक महिला भाविक रस्त्यावरून संध्याकाळी, रात्री आरती झाल्यानंतर हॉटेलच्या निवासस्थानी पायी जातात. याच संधीचा फायदा घेत मोटारसायकलच्या माध्यमातून सोनसाखळी चोर नजर ठेवून पाठलाग करत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळी तसेच किमती सोन्याचे दागिने धूमस्टाईलने लुटून नेण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. यात अनेक महिला भाविक चोरांच्या झटापटीत जखमी झाल्या आहेत.
या चोरांना पकडण्याचे मोठे आव्हान सध्या पोलिसांपुढे आहे. मात्र लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या अनेक हॉटेलसमोर किंवा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने पोलीस तपासाला खूप अडचणी येतात ही बाब पुढे आली आहे. प्रत्येक उपनगरात भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी बहुभाषिक पोलीस हेल्पलाईनचे मोठे फलक लावले तर भाविकांना तक्रार देण्यास मदत होईल.
सध्या शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये मनुष्यबळ कमी आहे. महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची संख्याही कमी आहे. महिला विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी सरकारने पोलीस दामिनी पथकाची स्थापना केली आहे. मात्र ही सेवा शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये बंद असल्याने अशा चोरीच्या घटनेत वाढ होताना प्रथमदर्शनी लक्षात येते.
साई संस्थानच्या कॉलेजकडे अनेक रोडरोमिओंचा रेसर बाईकवरचा स्टंट आणि त्या माध्यमातून तरुणींना होणारा त्रास, छेडछाड याचेही प्रमाण वाढले आहे. याची तक्रार अनेक कॉलेज तरुणींनी आपल्या पालकांकडे केली असून सध्या सर्वजण चिंतेत आहे. अनेक रोडरोमिओ दररोज ट्रिपलशीट, विना लायसेन्स, विनानंबरच्या दुचाकीवरून स्टंटबाजी करून कॉलेजच्या हेलिपॅड रस्त्यावर दुपारच्यावेळी मोठा धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गात दहशतीचे वातावरण आहे. यावर कायमचाच पायबंद घालण्यासाठी वाहतूक पोलीस व दामिनी पथक यांनी गंभीरपणे कारवाईचा बडगा उगारला तर भविष्यात महिला व विद्यर्थिनींसाठी मोठा आधार व सुरक्षितता मिळू शकते.
याच कॉलेज रोडवर अनेक बेकायदेशीर दारुची दुकाने थाटली असून त्याचाही मोठा त्रास विद्यार्थ्यांना होत आहे. एका आंतराष्ट्रीय तीर्थस्थानी महिला भाविकांना व शालेय विद्यार्थिनींना छेडछाडीचा, चोरीचा, लुटमारीचा, स्टंटबाजीचा त्रास होणे ही स्थानिकांच्या बाबतीत मोठा चिंतेचा विषय असून यावर पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपाधीक्षक संजय सातव, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, वाहतूक पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील यांनी दखल घेऊन शिर्डीत धडक कारवाई करून दहशतमुक्त वातावरण निर्माण करून भाविकांना व शालेय विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिर्डी ग्रामस्थांमधून होत आहे.