शिर्डीत संस्थान वगळता रस्त्यावर अन्नदान करणार्‍यांवर फौजदारी गुन्हा

एकावर गुन्हा दाखल
शिर्डीत संस्थान वगळता रस्त्यावर अन्नदान करणार्‍यांवर फौजदारी गुन्हा

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

विश्वाला सबका मालिक एक संदेश देणार्‍या साईबाबांच्या शिर्डी नगरीत अन्नदात्यांनी अन्नदान करून गर्दी जमविल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे शिर्डी पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. दरम्यान सोमवारी रात्री 51 वर्षीय नायर यांच्याविरोधात शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिसांच्या कारवाईचे शहरात स्वागत केले जात आहे.

शिर्डीत वर्षाकाठी करोडो भाविक साईदरबारी हजेरी लावतात. भाविक श्रद्धेने मंदिराच्या अवतीभोवती जमा झालेल्या भिक्षेकरूंना काही ना काही दान देत असतात. या कल्पनेतून देशविदेशातील साईभक्तांशी संपर्क साधून अन्नदानाच्या नावाखाली काही मंडळींनी गोरखधंदा मांडला आहे. भक्तांच्या भोळ्यापणाचा फायदा घेऊन येथील भिक्षेकरी लखोपती झाले आहेत. त्यामुळे याठिकाणी गेल्या दहा ते बारा वर्षांत त्यांची संख्या झपाट्याने वाढत गेली. पर्यायाने अपवाद वगळता गुन्हेगारी देखील वाढली. दरम्यानच्या काळात नगरपंचायतीच्या तत्कालीन उपनगराध्यक्षांनी शहरातील भिक्षेकरूंना पोलीस, साईबाबा संस्थान तसेच नगरपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने मोहीम राबवून त्यांची तुरुंगात रवानगी केली होती. याची भीती उराशी बाळगून त्यानंतर तीन चार वर्षे शिर्डीत भिक्षेकरुंची संख्या रोडावली होती. मात्र शताब्दी वर्षात पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली.

आजही करोनाच्या पार्श्वभूमीवर साईमंदिर बंद असले तरीसुद्धा अन्नदान करणार्‍या लोकांमुळे मोठ्या प्रमाणावर भिक्षेकरुंची संख्या वाढली आहे. या लोकांना कोणी वाली नसल्याने त्यांच्या करोनाच्या चाचण्या तसेच लसीकरण याबाबत कोणताही ताळमेळ नाही. शहरात करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नगरपंचायत प्रशासन कटीबद्ध असताना अन्नदानामुळे गर्दी केली जात आहे.

शिर्डी पोलिसांनी याप्रकरणी लक्ष वेधले असून दि. 28 रोजी रात्री 8 वाजता 16 गुंठे परिसरात मधूस्वामी पद्मनाभन नायर (वय 51) रा. साईश्रद्धा हाऊसिंग, शिर्डी यांनी अन्नदान करीत असताना गर्दी जमवून करोना रोगाचा संसर्ग होईल असे माहीत असतानाही जिल्हाधिकारी कार्यालयाकडील आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून यापुढे शिर्डी शहरात कोणीही अन्नदान करून गर्दी जमविण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचे विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन केले आहे.

शिर्डी नगरपंचायत, साईबाबा संस्थान तसेच शिर्डी पोलीस यांची संयुक्त बैठक घेऊन शहरातील भिक्षेकरूंना पालखी निवारा येथे पाठविण्यात येणार असून ज्यांना अन्नदान करावयाचे आहे त्यांनी साईबाबा संस्थानमध्ये करावे. संस्थान वगळता शहरात रस्त्यावर कुठेही अन्नदान करताना आढळल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल याची सर्वानी नोंद घ्यावी.

- काकासाहेब डोईफोडे, मुख्याधिकारी

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com