शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी परिसरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस अधिकार्यांच्या कठोर उपाययोजना सुरू असल्यामुळे गुन्हेगारी रोखण्यात यश मिळत असल्याची

माहिती सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी दिली.

शिर्डी शहर व परिसरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी जनता व पोलीस यांच्यात संवाद निर्माण करून गुन्हेगारी रोखण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली काही दिवसांपूर्वी झालेल्या दोन खुनातील सर्व संशयित आरोपींना शिर्डी पोलिसांच्या पथकाने 24 तासांत विविध ठिकाणावरून जेरबंद केले.

भाविकांना होणारा पाकिटमारीचा त्रास रोखण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांना गजाआड करण्यात आले होते. तसेच त्यांच्या सहवासात राहणारे, त्यांना पाठबळ देणारे, त्यांच्याशी संपर्क ठेवणार्या लोकांच्या हालचालींवर शिर्डी पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहे.

धूमस्टाईल चोरी, लुटमार, पाकीटमारी यांचे प्रमाणदेखील कमी करण्यात यश मिळाले आहे. जनतेनेदेखील गुन्हेगारी रोखण्यासाठी काही माहिती असेल तर ती देण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले आहे. विनामास्क फिरताना आढळून आलेल्या लोकांना दंड करण्यात येत असला तरी लोकांना शिस्त लागावी हा हेतू यामागे असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी दिली.