file photo
file photo|ANI
सार्वमत

शिर्डी येथे कोविड सेंटरची उभारणी करा

स्नेहलता कोल्हे यांची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी

Arvind Arkhade

कोपरगाव|प्रतिनिधी| Kopargav

अपुरा वैद्यकीय कर्मचारी वर्ग आणि अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य नसल्यामुळे कोपरगाव येथील कोरोना सेंटर रूग्णांना सेवा देण्यास असमर्थ ठरत असल्याने रूग्णांची हेळसांड होत आहे. शिर्डी येथे तातडीने कोरोना सेंटर उभारून रूग्णांच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवा अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेशजी टोपे, पालकमंत्री हसनजी मुश्रीफ आणि जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना निवेदन पाठवून मागणी करण्यात आली, निवेदनात म्हटले आहे, कोपरगाव विधानसभा मतदार संघामध्ये कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे रूग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे.

कोपरगाव येथील सदगुरू गंगागीर महाराज महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतीगृहाच्या इमारतीत तात्पुरते कोविड सेंटर उभारण्यात आलेले आहे. सध्या रूग्णांची संख्या वाढल्यामुळे त्याठिकाणी मुळातच कमी असलेल्या स्टाफवर अतिरिक्त ताण पडत असून अत्यावश्यक सेवेसाठीचे वैद्यकीय साहित्य उपलब्ध होत नसल्याने रूग्णांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यात एखादया रूग्णाची प्रकृती खालावल्यास त्या रूग्णास सुमारे 100 किलोमीटर लांब असलेल्या अहमदनगर येथील जिल्हा रूग्णालयात न्यावे लागते.

लांबच्या अंतरावर नेण्यासाठी रूग्णवाहिका उपलब्ध होऊन नेण्यापर्यंत बराचसा वेळ लागतो. त्यामुळे रूग्ण दगावण्याची शक्यता निर्माण होते. अशाच एका रूग्णाला अत्यावश्यक वैद्यकीय सुविधे अभावी अहमदनगर येथे स्थलांतरीत करण्याच्या प्रक्रियेत जीव गमवावा लागला असल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तालुक्यातील जनतेच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला असतांना लोकप्रतिनिधींना मात्र याचे गांभीर्य नाही.

कोपरगाव पासून जवळच असलेल्या शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या रूग्णालय वैद्यकीय सुविधा उपलब्ध असून रूग्णांना ऑक्सीजन, व्हेंटीलेटर व इतर वैद्यकीय सुविधा मिळणे सोयीचे होईल, याकरीता तातडीने शिर्डी येथे कोविड सेंटरची उभारणी करण्याची मागणी सौ.कोल्हे यांनी केली आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचेशी स्नेहलता कोल्हे यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून मतदार संघातील कोरोना परिस्थिती आणि कोविड सेंटर संदर्भात माहिती दिली त्यांनी तातडीने शिर्डी येथे कोविड सेंटरची उभारणी करण्यासाठी कार्यवाही करीत असल्याचे सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com