Corona
Corona
सार्वमत

शिर्डीतील दोन माजी उपनगराध्यक्ष करोना पॉझिटिव्ह

आकडा शंभरच्या वर

Arvind Arkhade

शिर्डी|प्रतिनिधी|Shirdi

शहरात मागील एक महिन्यापासून करोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे बाधितांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. काल साईनगरीतील दोन माजी उपनगराध्यक्ष बाधित आढळून आले असून, शहरातील करोना बाधितांची संख्या 104 वर जाऊन पोहचली आहे.

या दोन्ही माजी उपनगराध्यक्षांनी खासगी प्रयोगशाळेत आपले घशातील स्त्राव नमुने देऊन तपासणी केल्यानंतर त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह मिळून आले आहेत तर काल दिवसभरात 6 नविन रुग्णांची भर पडल्याचे शिर्डी नगरपंचायतचे नोडल अधिकारी मुरलीधर देसले यांनी यावेळी सांगितले आहे.

सामान्य नागरिकांबरोबरच जबाबदार नेतेमंडळी देखील आता बाधित होताना दिसून येत आहे. शहरातील एक माजी नगरसेवक बाधित आढळून आल्यानंतर लगेचच माजी नगराध्यक्ष करोना संक्रमित असल्याचे समोर आले होते आणि आता पुन्हा दोन माजी उपनगराध्यक्ष करोना पॉझिटिव्ह झाले आहेत. यातील एक साईआश्रम कोव्हिड केअर सेंटरमध्ये भरती होत आहे तर दुसरे कोठे उपचार घेणार याबद्दल आणखी माहिती मिळूनशकली नाही.

शिर्डी शहराचा करोनाचा आलेख खाली येण्यास तयार नाही. मागील काही दिवसांपासून करोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात नागरिकांनी काळजी घेत घरबाहेर पडणं बंद केल होतं.

एखादा दुसरा रुग्ण आढळून आल्यानं नागरिक विनाकारण बाहेर पडत नव्हते. मात्र आता करोनाच्या रुग्णांची संख्या 104 झाली असताना देखील शहरात नागरिकांची सार्वजनिक ठिकाणची गर्दी कमी होण्यास तयार नाही. परिणामी करोनाचा विळखा आटोक्यात येण्यास तयार नाही.

शहरातील रस्त्यावर आणि दुकानात सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर होताना दिसून येत नाही. मागील दहा दिवसांच्या जनता कर्फ्यूमध्ये देखील काही व्यावसायिकांनी आपली दुकाने चोरी छुपके चालू ठेवली.

रस्त्यावर विनाकारण फिरणार्‍यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून वाहतूक शाखेचे पोलीस पथक कारवाई करते मात्र तरीही नागरिक ऐकत नसल्याचे दिसून येत आहे. मास्क न लावता बाहेर पडणार्‍या नागरिकांवर नगरपंचायतने कारवाई करत लाखभर रुपयांचा दंड वसूल केला मात्र जैसे थे परिस्थिती आहे.

Deshdoot
www.deshdoot.com