शिर्डीतील बांधकाम मजूर हत्या प्रकरण : 4 लाखांची सुपारी देऊन हत्या

शिर्डीतील दोघे तर नाशिकच्या दोघांचा समावेश
शिर्डीतील बांधकाम मजूर हत्या प्रकरण : 4 लाखांची सुपारी देऊन हत्या

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी शहरातील बांधकाम मजूर हत्याप्रकरणी नाशिक येथून दोन तर शिर्डी येथील दोन अशा चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अजूनही काही आरोपी पसार आहेत. दरम्यान जुन्या वादाच्या कारणास्तव शिर्डीतील एका जणाने चार लाख रुपयांची सुपारी देऊन धिवर याचा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी शिर्डी येथे पत्रकार परिषदेत दिली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके व शिर्डी पोलिसांनी तपासाची चक्रे जलदगतीने फिरवून संशयित आरोपींचा माग घेण्यासाठी जवळपास 40 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपी मोटरसायकल व त्यांचा मार्ग निश्चित करण्यात आला होता. सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपींचे चेहरे, वाहनांचे नंबर स्पष्टपणे दिसत नव्हते. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण केल्यावर पोलिसांना या हत्याकांडातील आरोपी हे नाशिक येथील असल्याची खात्री झाली. तपास पथकाने आरोपींचे फोटो व मोटरसायकलचे वर्णन व त्यांनी केलेला गुन्हा याबाबतची माहिती नाशिक शहर आयुक्तालयातील गुन्हे शाखेला दिली. त्यानंतर नाशिक शहर आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला असता आरोपी राजू उर्फ चंद्रहास सुभाष उबाळे (वय 19) रा. पाथर्डी, जि.नाशिक, अविनाश सावंत (वय 19) रा. पाथर्डी, नासिक या दोघा आरोपींना ताब्यात घेऊन अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले होते.

आरोपींना शिर्डी पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांची कसून चौकशी केल्यानंतर सदरचा गुन्हा शिर्डी येथील अमोल लोंढे याचे सांगण्यावरून हसीम खान रा. नालासोपारा ठाणे तसेच कुलदीप पंडित रा. पाथर्डीगाव जि. नाशिक, गॅस ऊर्फ साहिल शेख रा.मोरवाडी नाशिक, साहिल पठाण रा. पाथर्डी गाव नाशिक यांचेसह केला असल्याची माहिती दिली.

सदरचा गुन्हा अमोल लोंढे याच्या सांगण्यावरून केला असल्याची माहिती आरोपींनी दिल्यानंतर शिर्डी येथील कालिकानगरमध्ये राहणार्‍या अमोल लोंढे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता राजेंद्र धिवर यांचे समवेत गेल्या दहा ते बारा वर्षांपासून वाद चालू होते. राजेंद्र धिवर हा नेहमी त्रास देत होता. त्याबाबत सन 2013 मध्ये शिर्डी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली होती. परंतु त्यानंतरही राजेंद्र धिवर हा नेहमी त्रास देत असल्याने याच कारणावरून शिर्डीतील अरविंद सोनवणे याच्या ओळखीने राजू उर्फ चंद्रहास सुभाष उबाळे व त्याचे साथीदारांना चार लाख रुपयांची सुपारी देऊन खून केल्याचे सांगितले आहे.

पोलिसांनी याप्रकरणी राजू उर्फ चंद्रहास सुभाष उबाळे (वय 19), अविनाश प्रल्हाद सावंत (वय 19) दोघे रा. पाथर्डी गाव जिल्हा नाशिक तसेच अमोल लोंढे (वय 32) राहणार कालिकानगर, शिर्डी. अरविंद महादेव सोनवणे (वय 19) रा. श्रीरामनगर शिर्डी यांना ताब्यात घेतले आहे. यातील आरोपी राजू उबाळे व अविनाश सावंत यांच्या विरुद्ध नाशिक येथील इंदिरानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com