
शिर्डी |प्रतिनिधी|Shirdi
भाजप सरकार सत्तेत आल्या पासून सतत घटना विरोधी कृत्य करत आहे. भारतीय संविधानाने लोकशाही मूल्य दिलेली असतांना मानवी मूल्य तुडवण्याचे व स्वातंत्र्यचा गळा घोटण्याचं काम सुरू आहे. मणिपुर याचे मोठे उदाहरण आहे़ यावर बोलू दिलं जात नाही. एक प्रकारे देश धोक्यात आला आहे. भारतीय घटना शाबूत ठेवण्यासाठी काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत लढा चालूच ठेवेल संपूर्ण भारतीयांनी काँग्रेस विचारधारा जोपसावी असे आवाहन वासनिक यांनी केले.
शिर्डी येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने संविधान के राह पर या विषयाला धरून राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. शिबीराचे उद्घाटन माजी मंत्री मुकुल वासनिक यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लिलोठीया, प्रदेश अध्यक्ष डॉ सिद्धार्थ हत्तीअंबिरे, आमदार लहू कानडे, विजय खडसे, प्रदेश उपाध्यक्ष राजेश लहाडे, अश्विनी खोब्रागडे, पवन डोंगरे, प्रियंका बिडकर, राहुल साळवे, विनय बोधे, गौतम गवई, राहुल वंजारी, प्रियंका रणपीसे, राजेंद्र वाघमारे, बंटी यादव, प्रविण सुरवडे, कृष्णा भंडारे, नितीन शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री वासनिक म्हणाले, ज्या देशात संसदीय कामकाज चालत नाही. विचारांचे आदान प्रदान होत नाही. विरोधी पक्षाची काय भुमिका आहे हे जर सरकार समजूनच घेत नाही. देशाचे पंतप्रधान विरोधी पक्षांच्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी कधीच तयारी ठेवत नाही़ अशा प्रकारची संसदीय लोकशाही काय कामाची असा सवाल त्यांनी उपस्थित केला. उपेक्षित, वंचित जनतेच्या जीवनाचे शिल्पकार ठरलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ बसपा किंवा इतर रिपब्लिकन पक्षाचे नसून काँग्रेसचे ही आहेत हे दाखवायचे असेल तर आता काँग्रेसनेही निळा झेंडा स्वीकारून जयभिमचा नारा द्यावा अशी मागणी राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लिलोठीया यांनी केली. प्रास्ताविक शिबिराचे आयोजक सिद्धार्थ हत्ती अंबीरे यांनी केले. अनुसूचित जातीच्या प्रश्नावर आम्ही राज्यभर रस्त्यावर उतरू असा इशारा देत जातीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी अशी मागणी त्यांनी केली.