शिर्डी शहर व साईमंदीर परिसरात चोख बंदोबस्त

शिर्डी शहर व साईमंदीर परिसरात चोख बंदोबस्त

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेवुन शिर्डी शहरात व साईमंदीर परिसरात गर्दी नियंत्रणासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून याकरीता अतिरिक्त पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत.

दरवर्षी नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागता निमित्त श्रींच्या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. या येणा-या साईभक्तांची होणारी संभाव्य गर्दी व कोरोना विषाणुचा वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाच्या दि.24 डिसेंबर 2021 चे आदेशानुसार रात्रौ.9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेले आहे. तसेच दि.31 डिसेंबर रोजी रात्रौ साईभक्तांची व ग्रामस्थांची मोठया प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने संस्थानच्या वतीने भाविकांना ध्वनीक्षेपकाद्वारे सुचना देण्यात आलेल्या आहेत.

तसेच रात्रौ 9 वाजेनंतर श्री साईबाबा मंदीरातील आतील बाजु व मंदिर गाभारा यामध्ये साईभक्तांना प्रवेश दिला जाणार नाही. संस्थानच्या संरक्षण विभागामार्फत मंदिराचे सर्व प्रवेशव्दार या ठिकाणी संरक्षण अधिकारी यांनी सुरक्षा अधिकारी, सुरक्षा सुपरवायझर, सुरक्षा रक्षकामार्फत परिसरात पेट्रोलींग व महाद्वार या ठिकाणी जमाव होणार नाही, त्याकामी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

तसेच संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत यांनी पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांचेशी मंदीर बंदोबस्तकामी पोलीस अधिकारी व अंमलदार यांची मागणी करण्यात आलेली होती. त्याप्रमाणे पोलीस विभागामार्फत बाहेरील पो.स्टे.चे 24 अधिकारी व 310 पोलीस अंमलदार (महिला 60 व 250 पुरुष) शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांचे नियंत्रणाखाली बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील व शहरवाहतुक शाखेचे ट्रॅफीक पोलीस यांच्यासह शिर्डी शहरात व मंदीर परिसरात लोकांचा जमाव होणार नाही, याबाबत दक्षता ठेवलेली असुन भाविकांनी व्दारकामाई समोरील खुले नाट्यगृह परिसर, चावडी समोरील परिसर व मंदिर प्रवेशव्दार आदी ठिकाणी गर्दी करुन नये. तसेच सर्व साईभक्तांनी व ग्रामस्थांनी याबाबत संस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन श्री साईबाबा संस्थानच्या वतीने करण्यात आलेले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com