अपयश झाकण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून घोषणांचा महापूर

अजित पवारांची टिका || राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डीत दोन दिवसीय चिंतन शिबीर
अपयश झाकण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून घोषणांचा महापूर

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

स्वतःचे अपयश झाकण्यासाठी शिंदे-फडणविस सरकार भरती करणार असल्याची खोटी घोषणा करत आहेत. मात्र लाखो तरुणांना ज्या मोठमोठ्या प्रकल्पातून नोकरी मिळणार होती ते प्रकल्प राज्याबाहेर गेले आणि आता म्हणताहेत आम्ही नविन प्रकल्प आणून भरती करणार आहोत. जर प्रकल्प येणार असतील तर त्यांची यादी दाखवा, असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारला केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा या दोन दिवसीय चिंतन शिबिराचे उद्घाटन विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, खा. सुप्रियाताई सुळे, दिलीप वळसे पाटील, खा. सुनिल तटकरे, आ. आदिती तटकरे, आ. धनंजय मुंडे, माजी मंत्री राजेश टोपे, विधानसभेचे माजी अध्यक्ष नरहरी हिरवळ, आ. रोहित पवार, आ. निलेश लंके, आशुतोष काळे, किरण लहामटे, प्राजक्त तनपुरे, संग्राम जगताप आदींसह राज्यभरातून आलेल्या राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांच्या उपस्थितीत शिर्डी येथील साई पालखी निवारा येथे उत्साहात करण्यात आले.

दोन दिवसीय शिबिरासाठी राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 हजारापेक्षा जास्त पदाधिकारी शिबिरासाठी उपस्थित आहेत. शुक्रवारच्या सत्रामध्ये ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, विचारवंत मनोहर भावे, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, अर्थतज्ञ श्री. पाटील, विजय चोरमारे, संजय आवटे आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी मार्गदर्शन करताना अजित पवार म्हणाले, आम्ही लाखो तरूणांना रोजगार देणार असे आता राज्य सरकार सांगत आहे. मात्र मोठमोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले. त्यांचे हे अपयश झाकण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. आघाडी सरकारच्या काळात प्रकल्प बाहेर गेल्याचा आरोप शिंदे-फडणवीस सरकार करत आहे. मात्र आम्ही पुराव्यानिशी दाखवून दिले की, हे प्रकल्प कधी बाहेर गेले. यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले पत्रच मिडियासमोर दाखविले. शेतकर्‍यांना मदत देणार अशा केवळ घोषणा केल्या जात आहेत. ज्या शेतकर्‍यांकडे आज दमडाही नाही त्याच्याकडूनच पंचनामे करण्यासाठी पैसे घेतले जात आहेत.

नगर जिल्ह्यातील ही घटना ताजी असताना सरकार काय मजा बघते का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित करत जोपर्यंत 145 चा आकडा शिंदे सरकारकडे आहे तोपर्यंत हे सरकार चालेल. ज्या दिवशी हा आकडा कमी होईल त्या दिवशी हे सरकार कोसळेल, असा दावा अजित पवार यांनी केला. तर कार्यकर्त्यांनी कुठल्याही आमिषाला बळू पडू नये, असे सूचक वक्तव्य करत आगामी निवडणुकांसाठी आतापासूनच तयारी करावी. जीवाचे रान करुन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व समविचारी पक्षांच्या उमेदवारांना सत्तेत पाठवावे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमधील यश हेच आपली लोकसभा व विधानसभेची वाट सुकर करणार आहे.

यावेळी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, शिंदे सरकारमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येतो. अपक्ष आमदारांमध्येही चकमक सुरु आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्याने बळीराजा हैराण झाला आहे. आतापर्यंत शेतकर्‍यांना मदत मिळणे अपेक्षित होते. मात्र तेथेही भ्रमनिराश झाला आहे. त्यामुळे शिंदे सरकारबाबत जनतेमध्ये नाराजीचे वातावरण आहे. यावेळी फोक्सकॉन, एअरबस आदींसारखे मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले असून शिंदे-फडणवीस यांनी केंद्राकडे याबाबत मागणी करणे आवश्यक होते. मात्र गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार केंद्रापुढे नरमाईचे भूमिका घेत असल्याचे पटेल म्हणाले.

एखाद्या पक्षातून फुटून जाऊन मुख्यमंत्री होणं हे वावगं नाही. मात्र आपण ज्या घरात वाढलो, तेथील अन्न खाल्लं ते घरच उद्ध्वस्त करणे हे कृतघ्नपणाचे लक्षण आहे. मुख्यमंत्री शिंदेंचे हे वागणे जनतेला रुचले नाही. मुद्दा शिवसेनेचा नाही मात्र राजकारणातील ही राक्षसी महत्वाकांक्षा लोकशाहीच्या गळ्यालाच नख लावत आहे.

- अजित पवार, विरोधी पक्षनेते

शिर्डीतील राष्ट्रवादीच्या चिंतन शिबीर येथे शरद पवार यांच्या प्रतिमेची आकर्षक रांगोळी साखरण्यात आली आहे. शिर्डीमध्ये दोन दिवशी राष्ट्रवादीचे चिंतन शिबिर सुरू झाले आहे. या शिबिरासाठी विशेष तयारी केली आहे. राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची शिर्डी येथील कार्यक्रमाच्या प्रमुख गेटसमोर रांगोळी साखरण्यात आली आहे.राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा साकारण्यात आला आहे. आलेले कार्यकर्ते रांगोळी जवळ फोटो काढताना दिसत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com