साई मंदिराजवळील बॅरीगेड्सचा प्रश्न आठवड्यात मार्गी लावू - बगाटे
सार्वमत

साई मंदिराजवळील बॅरीगेड्सचा प्रश्न आठवड्यात मार्गी लावू - बगाटे

Arvind Arkhade

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

द्वारकामाई व चावडी समोरच्या रस्त्यावर लावण्यात आलेल्या बँरीगेटींगचा प्रश्न येत्या आठवड्यात मार्गी लावू असे आश्वासन साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एच.बगाटे यांनी दिले असल्याचे साईनिर्माण उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष विजय कोते यांनी सांगितले.

दरम्यान द्वारकामाई समोरील बॅरीगेटींग काढण्यात यावे यासाठी शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने लोकशाही मार्गाने उपोषणाचा इशारा दिला होता यांविषयावर श्री. बगाटे यांनी सकारात्मक भुमिका दर्शवली असल्याने तुर्तास उपोषण मागे घेण्यात आले असून त्यांचा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करुन सत्कार केला.

साईमंदिराच्या दक्षिण बाजुस नऊ मीटर रस्त्यावर लावलेले बॅरीगेटींग दोन दिवसात काढुन द्वारकामाई मंदिर तसेच चावडी समोरील मार्ग खुला करावा अन्यथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा साईनिर्माण उदयोग समुहाचे अध्यक्ष विजय कोते यांनी प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांना दिला होता, मात्र संस्थानचे नवनिर्वाचित मुख्य कार्यकारी अधिकारी के.एच.बगाटे यांनी या प्रश्नी आठवडाभरात समन्वयक मार्ग काढून सोडवू असे आश्वासन दिले.

साईनिर्माणचे अध्यक्ष विजय कोते यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी ग्रामस्थांनी श्री बगाटे यांची भेट घेऊन त्यांच्या सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला

याप्रसंगी उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, अशोक गंगवाल, विनोद गंगवाल, फुटरमल जैन, लखीचंद लोढा, विजय संकलेचा, भरत चांदोरे, सुरेश जैन, पारस जैन, नरेश सुराना, सागर सावकारे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. साईबाबा संस्थानचे शिर्डी नगरपंचायतच्या मालकीच्या नऊ मीटर रस्त्यावर बँरीगेट लावल्याने ग्रामस्थांचा जाण्या येण्याचा मार्गच पुर्णतः बंद झाला असून ग्रामस्थांच्या दृष्टीने हा रस्ता अतिशय महत्वाचा आहे.

श्रावण महिना सुरू असून या महिन्यात देवदेवतांचे दर्शन होणे महत्वाचे आहे. तसेच शेतकर्‍यांचा सण पोळा अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपल्याने ग्रामदैवत असलेल्या मारुती मंदीरासमोर बैलजोडीस दर्शनासाठी कुठे न्यायचे असा प्रश्न पडला आहे. दरम्यान साईबाबा संस्थानने तातडीने दोन दिवसात सदरचे बँरीगेटींग काढुन हा रस्ता पुर्ववत खुला केला नाहीतर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारींच्या कार्यालयासमोर शिर्डी ग्रामस्थ उपोषण करणार असल्याचा इशारा विजय कोते यांनी दिला आहे.

द्वारकामाई तसेच चावडी समोरच्या नगरपंचायतच्या रस्त्यावर साईसंस्थानने बॅरीगेटींग लावून याठिकाणावरून येणार्‍या जाणार्‍यांचा रस्ताच बंद करून टाकला आहे. सदरील रस्ता बंद केल्याने ग्रामस्थांचे हाल होत असून आश्वासनाप्रमाणे सदरचा मार्ग खुला न केल्यास श्रद्धा आणी सबुरीचे पालन करत उपोषणाला बसणार आहे.

-विजय कोते अध्यक्ष, साईनिर्माण उद्योग समुह

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com