शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

वीज महावितरण कंपनीने ग्राहकांना दिलेली वाढीव बिले व लॉकडाऊन काळातील शिर्डी शहरातील करदात्यांचे संपूर्ण कर रद्द करावे

या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने काल नगरपंचायतच्या व्यापारी संकुलासमोरील पटांगणात वीज बिलांची होळी करून राज्य सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करत घोषणाबाजी करण्यात आली आहे.

शिर्डी शहरातील भाजपा कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र सरकारचा निषेध करत शिर्डीतील उपविभागीय कार्यालयासमोर वीज बिलाची होळी केली, याप्रसंगी शिर्डी शहर भाजपा अध्यक्ष सचिन शिंदे यांनी सांगितले की, करोना काळात शिर्डीचे व्यवसाय पूर्णपणे टाळेबंद असताना नागरिकांना हजारो रुपयांचे बिल आलेच कसे याची चौकशी व्हायला हवी तसेच राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घोषणा केली होती की लॉकडाऊन काळात तीन महिने महाराष्ट्रातील जनतेचे वीज बील आम्ही माफ करू.परंतु आज मंत्री महोदयांनी जनतेची फसवणूक केली याचा आम्ही निषेध करतो.

भाजपा उद्योग आघाडीचे प्रमुख शिवाजी गोंदकर म्हणाले, करोना काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे संपूर्ण कर माफ करावे, परंतु हे सरकार जनतेला करांच्या बोजाखाली दाबून जनतेची पिळवणूक करत आहेत. या तिघाडी सरकारने त्वरित वीज बिल माफ करावे अन्यथा यापेक्षा मोठे आंदोलन आम्ही करू याची दखल सरकारने घ्यावी.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, नगरसेवक अशोक गोंदकर, जगन्नाथ गोंदकर, गजानन शेर्वेकर, तुकाराम गोंदकर, रमेश बिडये, रवींद्र गोंदकर, राजेश शर्मा, सुधीर शिंदे, किरण बोर्हाडे, योगेश गोंदकर, स्वानंद रासने, किरण बर्डे, राम आहेर, जयंती पटेल, भाऊ भोसले, लखन बेलदार, अमोल बढे, रावसाहेब शेळके, सचिन घुले यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्रातील हे तिघाडी सरकार तीन पक्षांतील असंवेदनशील सरकार असून या तीन पक्षांच्या नेत्यांतील राजकीय कुरघोडीमुळे राज्यातील सरकारी अधिकारी भ्रमीत असून त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे राज्यातील सामान्य जनता भराडली जात असून सामान्य जनतेला व कष्टकरी शेतकर्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
- राजेंद्र गोंदकर, जिल्हाध्यक्ष भाजप